वर्षभरापूर्वीच्या ओळखीवर ठेवला विश्वास; सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीला दोघांनी दिला ‘धोका’, पुण्यात खळबळ

पुणे : शासकीय सेवेत रुजू होऊन सुरक्षित भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीची दोघांनी शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. वर्षभर तरुणीच्या संपर्कात राहून आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर पैशांची मागणी करत तिला गंडा घातला.
या प्रकरणी पीडित तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

वर्षभरापूर्वी झाली ओळख, नोकरीचे दाखवले आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपींशी सुमारे वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी तिला शासकीय विभागात चांगली नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.


आरोपींच्या बोलण्यावर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तरुणीने त्यांना टप्प्याटप्प्याने तब्बल ५ लाख १७ हजार रुपये दिले.
नोकरी मिळाली नाही, पैसेही परत केले नाहीत
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी नोकरीच्या विषयावर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. बराच काळ उलटूनही नोकरीचे कोणतेही पत्र मिळाले नाही. तसेच दिलेले पैसेही परत करण्यात आले नाहीत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने अखेर पर्वती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पर्वती पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोणी पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.