जिल्हा परिषद शिक्षकांसाठी मोठा निर्णय! पदोन्नतीच्या नियमांत बदल; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने पदोन्नती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. टीईटी पात्रतेबाबतचे नियम शिथिल करण्यात आल्याने अधिक शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच पदोन्नती प्रक्रिया निश्चित वार्षिक वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या नियमानुसार 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी पात्र मानले जात होते. मात्र, सुधारित नियमांनुसार आता दरवर्षी 1 ऑगस्टपर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणारे शिक्षकही पदोन्नतीसाठी पात्र असतील. याबाबतची सुधारित नियमावली शालेय शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

या निर्णयासोबतच 14 मे रोजी जारी करण्यात आलेले पूर्वीचे शासनपत्र रद्द करण्यात आले असून पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेळेत आणि एकसमान पद्धतीने राबवण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.


नवीन वेळापत्रकानुसार दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक होईल. त्या तारखेपर्यंत संबंधित शिक्षकाचा सेवाकाल, टीईटी/सीटीईटी आणि इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाईल. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रियेत एकसमानता आणण्यासाठी वार्षिक वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 1 जानेवारीला तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी, 31 जानेवारीपर्यंत अंतिम यादी, 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान पदोन्नती समितीची बैठक, 31 मार्चपर्यंत पदोन्नती आदेश आणि 2 मेपर्यंत नव्या पदावर रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, आता दरवर्षी 1 ऑगस्टपर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांनाही पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.