वक्फ दुरुस्ती विधेयक मतदानाच्या वेळी शरद पवार गैरहजर, संजय राऊत यांनी सांगितले कारण, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : लोकसभेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर ९५ ने विरोध केला. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट असलेल्या या विधेयकाची जोरदार चर्चा झाली. राज्यसभेत काठावरचे बहुमत असलेल्या सरकारने सहजपणे बहुमत जमवले. राज्यसभेतील मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अनुपस्थित होते.
लोकसभेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वक्फ सुधारणा विधेयकावर आक्रमक झाले होते पवारांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.
शरद पवारांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून फौजिया खान यांनी चर्चेत सहभाग घेतला. शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती.
त्यामुळे ते मतदानास गैरहजर राहिले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. राज्यसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून फौजिया खान यांनी मतदान केले असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.