मध्यरात्री बसस्टॉपवर एकटी महिला उभी होती… 3 तासांत 40 पुरुष जवळ आले, मग उघडलं धक्कादायक सत्य!


महिलांसाठी शहरं खरंच किती सुरक्षित आहेत? रात्री एकटी महिला रस्त्यावर उभी राहिली तर तिच्याकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो? हे जाणून घेण्यासाठी हैदराबादमध्ये एका वरिष्ठ महिला IPS अधिकाऱ्याने असा प्रयोग केला, ज्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. मलकाजगिरीच्या पोलिस आयुक्त IPS बी. सुमती यांनी कोणतीही पोलिस सुरक्षा न घेता मध्यरात्री बसस्टॉपवर सामान्य महिलेसारखं उभं राहत शहरातील वास्तव तपासलं आणि अवघ्या तीन तासांत जे घडलं, त्याने अनेकांना धक्का बसला आहे.

हा संपूर्ण अंडरकव्हर ऑपरेशन रात्री 12.30 ते पहाटे 3.30 दरम्यान करण्यात आला. साध्या कपड्यांमध्ये बी. सुमती या मलकाजगिरी परिसरातील एका बसस्टॉपवर एकट्या उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्यासोबत ना बॉडीगार्ड होता, ना पोलिसांचा ताफा. उद्देश एकच होता — महिलांना रात्री सार्वजनिक ठिकाणी नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे प्रत्यक्ष अनुभवणं.

या तीन तासांच्या कालावधीत तब्बल 40 पुरुष त्यांच्या जवळ आले. काहीजण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे दिसून आले. काहींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर काहींचं वर्तन संशयास्पद होतं. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या महिलेशी ते बोलत होते ती महिला प्रत्यक्षात शहराची पोलिस आयुक्त आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

या ऑपरेशननंतर पोलिसांनी त्या सर्व व्यक्तींची ओळख पटवली. मात्र, थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलिसांनी वेगळी भूमिका घेतली. संबंधितांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं. महिलांप्रती आदर, सार्वजनिक ठिकाणी वर्तन आणि कायद्याची जाणीव याबाबत त्यांना कठोर समज देण्यात आली. पोलिसांच्या मते, केवळ अटक किंवा शिक्षा करून समस्या सुटत नाही, तर मानसिकता बदलणं अधिक गरजेचं आहे.

विशेष म्हणजे, बी. सुमती यांनी यापूर्वीही अशाच प्रकारचं ऑपरेशन केलं होतं. सुमारे 25 वर्षांपूर्वी DSP म्हणून काम करत असताना त्यांनी काजीपेट रेल्वे स्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी असाच प्रयोग केला होता.

IPS बी. सुमती या तेलंगणा कॅडरमधील वरिष्ठ अधिकारी असून नुकत्याच त्या मलकाजगिरीच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त बनल्या आहेत. त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. माओवादी आत्मसमर्पण मोहिमांपासून ते AI आधारित स्मार्ट पोलिसिंगपर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका राहिली आहे.

या धाडसी प्रयोगामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, रात्री महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी केवळ पोलिस यंत्रणाच नव्हे तर समाजाची मानसिकताही बदलण्याची गरज असल्याचं अधोरेखित झालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!