सुनेत्रा पवारांवरील’ वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; काँग्रेसला २४ तासांचा इशारा, कारवाई नाही तर राज्यभर रणशिंग


अहमदनगर : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आल्याचा आरोप असलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक संघटना आक्रमक झाली असून, नेवासे तालुक्यातील युवा नेते अब्दुल शेख यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला इशारा दिला आहे की, योग्य निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र लोकशाही आंदोलन उभारले जाईल.

पत्रकार परिषदेत बोलताना अब्दुल शेख म्हणाले की, राजकारणात मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि धोरणांवरील संघर्ष स्वाभाविक असतो. मात्र महिला नेत्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही केवळ एका व्यक्तीची बदनामी नसून संपूर्ण महिला वर्गाचा अवमान आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेत अशा प्रकारच्या वक्तव्यांना कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

“राजकीय विरोध असू शकतो, पण तो विचारांपुरता मर्यादित असावा. वैयक्तिक टीका, चारित्र्यहनन किंवा महिलांचा अवमान करून राजकारण करण्याची पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान राखणे ही सर्व राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही शेख यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वालाही थेट लक्ष्य केले. या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी काँग्रेसने स्पष्ट भूमिका घ्यावी. अन्यथा महिलांच्या सन्मानाबाबत पक्षाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडेल,” असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “सुनेत्रा पवार यांच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ एका नेत्याचा नाही, तर प्रत्येक महिलेच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई झाली नाही, तर जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी भाषेवर संयम ठेवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राची राजकीय ओळख ही सभ्यता, परस्पर आदर आणि वैचारिक संघर्षाची राहिली आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरील टीका टाळून लोकशाही मूल्यांचे जतन करणे ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, काँग्रेस नेतृत्व यावर काय भूमिका घेते आणि पुढील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!