दिवसा उन्हाचा तडाखा, संध्याकाळी पावसाचा धडाका! पुण्यासह राज्यात पुढील २ दिवस नेमकं काय होणार?


पुणे : सप्टेंबरचा शेवट जवळ येत असतानाच पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा चढू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जाणवणारी तीव्र उष्णता आणि वाढलेला उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे दिवसभर कडक ऊन जाणवत असताना दुसरीकडे पुढील दोन दिवस काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका, तर काही भागांत अचानक पावसाच्या सरी असे परस्परविरोधी हवामान पाहायला मिळू शकते.

पुणे शहरातही तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून शहरात कमाल ३१.७ अंश सेल्सिअस, तर किमान २२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारच्या वेळी उकाडा अधिक वाढत आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांच्या पुढे गेले आहे. रात्री आणि पहाटे जाणवणारा गारवा कमी झाल्याने पुणेकरांना पुन्हा उन्हाळ्यासारखी परिस्थिती जाणवू लागली आहे.

या वाढत्या उष्णतेमुळे वातावरणात स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही अशा प्रकारचा पाऊस पडू शकतो. मात्र, हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी किंवा सर्वदूर होणार नसून स्थानिक स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी संध्याकाळनंतर हवामानात अचानक बदल होऊ शकतो. काही भागांत ढग दाटून येत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी बरसू शकतात. त्यामुळे दिवसभर उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर संध्याकाळी अचानक पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात यंदा ऑक्टोबर हीट नेहमीपेक्षा लवकर जाणवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, वाढत्या उष्णतेसोबतच स्थानिक पावसाची शक्यताही निर्माण झाल्याने पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी पुढील दोन दिवस सकाळी उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी पावसाच्या सरी, असे बदलते हवामान अनुभवायला मिळू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!