शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं चाललंय काय? तीन ‘एकनाथ शिंदें’चा संजय राऊतांचा दावा; फडणवीस आणि अमित शाहांच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे नेमकं काय घडतंय? सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत आहे की अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे या प्रश्नांची चर्चा पुन्हा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तीन वेगवेगळे ‘एकनाथ शिंदे’ असल्याचा दावा करत राऊत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, यातील एका शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, तर दुसऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या कथित तीन शिंदेंबाबत सूचक विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या तिघांची ओळख लवकरच समोर येईल. यापैकी दोन जणांनी आपल्याशी संपर्क साधल्याचाही दावा त्यांनी केला. ‘आम्ही चुकलो, आता काय करावं? हवा बदलली आहे,’ अशा भावना या दोघांनी व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले. मात्र, या नेत्यांची नावे किंवा त्यांची नेमकी ओळख त्यांनी उघड केली नाही.
शिंदे गटात दोन सत्ताकेंद्रे? फडणवीस-शाहांच्या भूमिकेवर प्रश्न

शिंदे यांच्या पक्षात कोणाला ताकद द्यायची, हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील, असे राऊत म्हणाले. एका शिंदेंना फडणवीस, तर दुसऱ्या शिंदेंना अमित शाह बळ देत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षात नेतृत्व आणि राजकीय प्रभावावरून काही वेगळी समीकरणे तयार होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

समोर हसू, पाठीमागे संघर्ष? शिंदे-फडणवीसांवर बोचरी टीका
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांवरही राऊत यांनी निशाणा साधला. दोघेही समोरासमोर आल्यावर एकमेकांशी हसून बोलतात; मात्र त्यांच्यात विश्वासाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. संधी मिळताच एकमेकांवर राजकीय वार करण्याची तयारी दोन्ही नेत्यांकडून सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सुनेत्रा पवारांच्या पक्षाला सर्वात आधी धक्का बसणार?
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही राऊत यांनी मोठे भाकीत केले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे विचारधारेवर उभे असलेले पक्ष नसून अमित शाह यांनी निर्माण केलेले गट असल्याचा आरोप त्यांनी केला. शाह यांचे पाठबळ असेपर्यंतच हे गट टिकतील, असे सांगत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सर्वात आधी कोसळेल, असा दावा त्यांनी केला. शिंदे यांच्या पक्षातही अस्वस्थता आणि अस्थिरता असल्याचे ते म्हणाले.
अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरलं
दरम्यान, अभिनेता तुषार कपूर यांना मिळालेल्या खंडणीच्या धमकीवरूनही राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. अमिताभ बच्चन यांना सुरक्षेच्या कडेकोट व्यवस्थेत वावरावे लागत असल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. प्रदीप पूर्णेकर, टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे लोक सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणूनही अपयशी ठरल्याचा आरोप करत, राज्यात खंडणीच्या धमक्या दिल्या जात असताना मुख्यमंत्री गोकुळच्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी केली. एकीकडे तीन शिंदेंचा दावा, दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या पक्षाच्या भवितव्याबाबत केलेले भाकीत आणि सरकारवरील हल्लाबोल यामुळे संजय राऊत यांच्या विधानांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यांच्या दाव्यांवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
