मित्राच्या हत्येनंतर २० दिवस भीतीच्या छायेत! रात्री स्वप्नात येऊन छळू लागला मृत मित्र, अखेर आरोपी स्वतःच पोहोचला पोलिसांच्या दारात; डोंबिवलीत खळबळ

डोंबिवली : दारूच्या पार्टीत झालेला वाद, संतापाच्या भरात मित्राची हत्या आणि त्यानंतर तब्बल तीन आठवडे मनात दडवलेलं गुपित! मात्र, रात्रीच्या स्वप्नांनी आरोपीची झोपच उडवली. ज्या मित्राचा जीव घेतला, तोच वारंवार स्वप्नात दिसू लागल्याने अखेर २४ वर्षीय तरुणाने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी खाडीकिनारी शोधमोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेतला. डोंबिवली पश्चिमेतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

मृत व्यक्तीचे नाव विशाल कदम (वय ४२) असून प्रभू करकडे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, मद्यपान करताना झालेला वाद विशालच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.
पार्टीत नेमकं काय घडलं? मित्रांमधील वाद पोहोचला टोकाला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० दिवसांपूर्वी प्रभू आणि विशाल हे डोंबिवली पश्चिम येथील संदेश म्हात्रे (वय ४२) याच्या घरी एकत्र मद्यपान करत होते. याचवेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेल्या या प्रकाराने अचानक हिंसक वळण घेतले. प्रभूने विशालला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विशालचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपीची झोपच उडाली!
घटनेनंतर प्रभूने हा प्रकार लपवून ठेवला. मात्र, मित्राच्या मृत्यूचे गुपित मनात ठेवून तो सामान्य आयुष्य जगू शकत नव्हता. विशाल वारंवार स्वप्नात दिसत असल्याने त्याला रात्री झोपेतून दचकून जाग यायची. जवळपास तीन आठवडे तो या मानसिक अस्वस्थतेत होता. अखेर या परिस्थितीला कंटाळून त्याने स्वतः पोलिसांसमोर जाण्याचा निर्णय घेतला.
थेट ठाणे गुन्हे शाखेत पोहोचला अन् हत्येचा उलगडा!
प्रभूने ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन शरणागती पत्करली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विष्णूनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने विशालच्या हत्येची कबुली दिली. एवढेच नाही, तर मृतदेह कुठे टाकला होता, याची माहितीही तपास अधिकाऱ्यांना दिली.
प्रभूने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक खाडीकिनारी पोहोचले. तेथून विशालचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अनुत्तरित असलेल्या या प्रकरणाचा महत्त्वाचा उलगडा झाला.
घरमालकालाही अटक, मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी संदेश म्हात्रे यालाही अटक केली आहे. प्रभू ज्या घरात भाड्याने राहत होता, ते घर संदेशचे असल्याची माहिती आहे. विशालच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून त्याला डोंबिवली पश्चिमेतील राहत्या घरातून अटक करण्यात आली.
या प्रकरणात विशालची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, यासह इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. जवळच्या मित्राचा जीव घेणारा तरुण अखेर स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचल्याने डोंबिवलीतील या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
