2029 च्या निवडणुकीसाठी CM फडणवीसांची मोठी फिल्डिंग! अधिकाऱ्यांना कडक अल्टिमेटम; काय आहे निर्णय?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सुरू असलेले मेट्रो प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा, असा अल्टिमेटम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मेट्रो-10 (मिरा गाव–गायमुख) प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. सुमारे 9.68 किमी लांबीच्या या मार्गासाठी 8,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या मार्गावर 5 एलिव्हेटेड स्थानके असतील.

मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांमध्ये होणारा विलंब, वाढता खर्च आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक अधिक जलद, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रस्तावित प्रमुख मेट्रो मार्ग
मेट्रो-11: अणिक डेपो – वडाळा – गेटवे ऑफ इंडिया (17.51 किमी)
नवी मुंबई मेट्रो-1A आणि 2: बेलापूर – सागर संगम, पेंधर – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (17.09 किमी)
मेट्रो-8: मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ (34.90 किमी)
मेट्रो-10: गायमुख – छत्रपती शिवाजी महाराज चौक (9.20 किमी)
मेट्रो-13: शिवाजी चौक – वसई – विरार (25.03 किमी)
मेट्रो-12A: मानपाडा – कल्याण – खुटारी – तळोजा (18.40 किमी)
मेट्रो-3 विस्तार: कफ परेड – नेव्हीनगर (1.40 किमी)
मेट्रो-14: कांजूरमार्ग – बदलापूर (45.15 किमी)
सरकारचे लक्ष्य म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोचे जाळे 2029 पूर्वी मोठ्या प्रमाणात पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.