पुणे जिल्हा हळहळला! एकाच दिवशी जन्म…अन् मृत्यूही एकाच क्षणी! जुळ्या बहीण-भावाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील तळेरान गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाझर तलावात बुडून ११ वर्षीय जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मृत मुलांची नावे श्रावणी साबळे आणि गणेश साबळे अशी आहेत. दोघेही आदिवासी प्रकल्पाच्या घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या निवासी शाळेत शिक्षण घेत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते घरी आले होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात तीन मोठ्या मुलींसह ही जुळी भावंडे होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांची मोठी बहीण कपडे धुण्यासाठी तळेरान येथील वसईवाडी पाझर तलावावर गेली होती. तिच्या मागोमाग श्रावणी आणि गणेशही तलावाजवळ गेले. पाण्यात उतरल्यावर खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. हे पाहताच मोठ्या बहिणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र तिला पोहता येत नसल्याने ती काहीच करू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधमोहीम सुरू केल्यानंतर प्रथम श्रावणीचा मृतदेह सापडला, तर काही वेळाने गणेशचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
