उष्णतेपासून दिलासा घ्यायला गेला, पण काळानेच घात केला; विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून घरातील कुलर सुरू करताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली.

नजीर खदीर सय्यद असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तो कामावर जाण्याची तयारी करत असताना घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी भरत होता. त्याचवेळी कुलरमध्ये अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच पत्नी आणि वडिलांनी तात्काळ वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर नजीरला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नजीरच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!