आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; 12 वीपर्यंत मोफत शिक्षण, CET फीही भरणार

शिर्डी : शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी शिर्डी साईबाबा संस्थानने अत्यंत दिलासादायक आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. अनेक कुटुंबांमध्ये कर्ता व्यक्ती गेल्यानंतर मुलांचे शिक्षण अर्धवट राहते, स्वप्नं तुटतात आणि आर्थिक संकटामुळे भविष्य अंधारात जातं. हीच परिस्थिती बदलण्यासाठी साई संस्थान पुढे सरसावलं असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आता मोफत शिक्षण आणि निवासाची सुविधा दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत दहावीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार आहे. केवळ शिक्षणच नाही, तर विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील संस्थानकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या CET परीक्षेची फी देखील साई संस्थानच भरणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन, निवास आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी संस्थानने दर्शवली आहे.

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकरी कुटुंबातील मुलांचं शिक्षण थांबू नये आणि त्यांना योग्य दिशा मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न संस्थान करत आहे.

साई संस्थानच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, आर्थिक संकटामुळे थांबणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आता नवी दिशा मिळणार आहे.