मुंबई, पुणे शहराच्या बदलत्या घडामोडींचा शरद पवारांनी घेतला वेध! उरुळी कांचन ग्रामसचिवालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शब्दोन् शब्द भाषण…

उरुळीकांचन : नवीन ग्रामपंचायतीच्या वास्तूच्या उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. आपले खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर- हवेलीचे आमदार माऊली कटके, जगन्नाथ बापू शेवाळे, अशोक बापू पवार, रमेश अप्पा थोरात, देविदास भन्साळी, उरूळी कांचन व सोपान कांचनच्या सरपंच सौ. ऋतुजा कांचन, प्रकाश म्हस्के, अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू- भगिनींनो..

एका चांगल्या कार्यक्रमाला आज येता आलं, याचा मला आनंद आहे. गेली अनेक वर्ष या ना त्या निमित्तानं मी इथे येत असतो. गावांशी काही नातं जुळतं, ऋणानुबंध तयार होतात. उरुळी कांचन म्हटल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या भागातल्या सामान्य लोकांनी गांधी- नेहरूंचा विचार हा मजबूत करण्यासाठी हातभार लावला, त्या गावांच्या मालिकेमध्ये उरुळी कांचनचा उल्लेख हा सबंध देशात केला जातो. आज इथे आल्यानंतर मणिभाईंची आठवण होते, बापू कांचन यांची आठवण होते, दत्तोबा कांचन यांची आठवण होते, अनेकांची नावं या ठिकाणी सांगता येतील.
सुरुवातीच्या काळामध्ये हे गाव एवढं वाढलं नव्हतं. पण या गावामध्ये अनेकांची वर्दळ असायची. त्याचं महत्वाचं कारण याच भागामध्ये जगामध्ये, देशामध्ये काय चाललंय? याची नोंद घेऊन विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज होती. लहानसं उरूळी कांचन! मला आठवतंय की, एक दिवशी इथं मी आलो होतो. आल्यानंतर बापूंच्याकडं पु. ल. देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर भेटले. मराठीतले अत्यंत उच्च दर्जाचे लेखक. ज्यांचा नावलौकिक देशाच्या साहित्यामध्ये फार मोठा आहे, त्यांची उपस्थिती या गावामध्ये होती. म्हणून या गावाने नाती जपलेली आहेत, माणसं जोडलेली आहेत. स्वातंत्र्य चळवळीचा विचार हा काही सोडलेला नाही. गेली अनेक वर्ष आपण हे बघतोय. कधीकाळी निवडणुकीसाठीसुद्धा मी आलो असेन. एखाद दुसरा प्रसंग सोडला तर, माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायला इथे कधी यावं लागलं नाही. देविदास आहेत, बाकीचे लोक आहेत. हे जबाबदारी घेतात आणि मला सांगतात की, “महाराष्ट्रात तुम्ही काम करा, इथलं आम्ही बघतो” त्याचं महत्वाचं कारण विचारांना पाठिंबा, विचार जतन करणं हे सूत्र उरूळी कांचनने कायम ठेवलेलं आहे.

आज चित्र बदलतंय. ज्याचा उल्लेख या ठिकाणी खासदारांनी केला, आमदारांनी केला “नागरिकरण होतंय, गावं बदलतात” कळत नाही अनेक ठिकाणी आपण कुठे आलो? आणखीन होणार आहे. त्याची काही कारणं आहेत. पुणे शहराच्या लोकसंख्येचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतोय. आज राज्यात आणि देशामध्ये आम्हाला हे चित्र बघायला मिळतं की, ‘लोकसंख्या वाढतेय, जमिनी कमी होत आहेत’. शेतीची जमीन कमी होतेय. त्याचं कारण शेतीची जमीन ही अन्य कामांसाठी घ्यावी लागते. त्याचा परिणाम एकंदर वातावरण बदललेलं दिसतं. गेल्या दहा दिवसांपूर्वी माझ्याकडे एक बैठक बोलावलेली होती, पुरंदरचा विमानतळ! त्याला स्थानिक लोकांचा विरोध होता. सविस्तरपणे आम्ही चर्चा केली. लोकांना सांगितलं की, तुमच्या हिताची जपणूक कशी करायची? त्याची काळजी घेऊ. जिल्हाधिकारी, बाकीचे अधिकारी या सगळ्यांना मी निमंत्रित केलं. ज्यांची जमीन जातेय, त्यांना बोलावलं आणि त्यांना पटवून दिलं. आता त्या कामासाठी त्यांचा विरोध १०० टक्के गेला, असं मी म्हणत नाही. पण कमी झालेला आहे.

हा एक विमानतळ झाल्यानंतर चित्र बघतोय मी. मी अनेकदा बारामती किंवा इथून हेलिकॉप्टरने जात असतो. कधी मुंबईला, कधी आणखी गावांमध्ये. पण मुंबईला जाताना हेलिकॉप्टरने निघाल्यावर पनवेलच्या पुढं एक वेगळं चित्र दिसतं. ते वेगळं चित्र म्हणजे मुंबईचं विमानतळ आता तिथे जाणार आहे, तो आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे आणि हे सगळं चित्र बदलतंय. मोठे कारखाने येत आहेत, मोठ्या संस्था येत आहेत, न ओळखीतले अनेक लोक भेटतायत. पण ते होणार आणि हेच चित्र पुरंदरला होईल. कारण हा जो विमानतळ आहे, तो तुम्ही सासवडकडनं आलात की, पारगाव आणि त्या भागामध्ये त्याचं केंद्र असेल. उरुळी कांचनवरनं गेलात तर त्याचीही जवळीक त्या ठिकाणी असेल. बारामतीवरून आलात तर त्याचं मध्यवर्ती ठिकाण ते असेल आणि सासवडकडनं आलात तर, त्याचंही ते मध्यवर्ती ठिकाण असेल. हा विमानतळ निव्वळ पुरंदर किंवा पुणे याच्यासाठीच सीमित राहणार नाही. तो ज्यावेळेला उरूळी कांचनला होईल, त्यावेळेला उरूळी कांचनपासून ते सोलापूरपर्यंत जे घटक आहेत की, ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे, त्यांचा मार्ग हा राहणार आहे. उरूळी कांचनला येत असताना अहमदनगरवरून येणारी ट्रॅफिक ज्यांना परदेशात जायचंय ती या रस्त्याने येणार आहे. तीच गोष्ट हडपसरपासून येणाऱ्या रस्त्याला आहे. तीच गोष्ट सातारा आणि नंतरच्या काळामध्ये तुमचं सासवड आणि सासवडवरून इथं. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की, एक प्रकल्पाने किती परिणाम होणार आहे आणि चित्र कसं बदलणार आहे. पण हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे करायचं असेल तर, दुर्दैवाने जमीन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून जमीन कमी होतेय, माणसं कमी झाली नाहीत. जमिनीवरचं ओझं वाढलेलंय, ती जमीन इकडं तिकडं कामाला दिली.
याच्यापूर्वी जिल्ह्यामध्ये अनेक धरणं आपण बांधली. ससवानचं धरण बांधलं, खाली उजनीचं धरण बांधलं. वरच्या बाजूला इंग्रजांच्या काळामध्ये भाटघरचं धरण बांधलं आणि पार जुन्नरपर्यंत अनेक धरणं आपण बांधली. त्या धरणांचा फायदा असा की, लोकांचं जीवनमान बदललं. आज पहिल्यासारखं चित्र दिसत नाही. जुन्नरला गेल्यानंतर एकेकाळी मला जुन्नरच्या निवडणुकीसाठी सभा घ्यायची असेल तर, ती आम्ही जुन्नरला घ्यायचो नाही. ती मुंबईत घ्यायचो. त्याचं कारण जुन्नर हे मुंबईत जात होतं. मुंबई शहरामध्ये जुन्नरच्या लोकांचा उल्लेख ‘जुन्नरी’ म्हणून करतात. ही जुन्नरींची लोकसंख्या मुंबईमध्ये वाढली. याचं महत्वाचं कारण की, त्या काळामध्ये विकास नव्हता. पण ही धरणं केली, त्या धरणांच्या उभारणीतून शेती सुधारली. आज साखर कारखाने चांगले चालू आहेत, केळीच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत. नारायणगावच्या नंतर खाली उतरतात डायरेक्ट मुंबईचा मार्केट आणि केलेला माल हा देशाच्या बाहेरसुद्धा पाठवतात. या सगळ्या गोष्टींनी आज जुन्नर बदललं हे चित्र दिसतं. फक्त जुन्नर नाही तर ही गोष्ट आंबेगावात दिसेल, ही गोष्ट खेडमध्ये दिसेल, ही गोष्ट हवेली तालुक्यात दिसेल. हे सगळे बदल आज होत आहेत आणि या बदलांची नोंद घेऊन आपणसुद्धा बदललं पाहिजे. आपल्या कुटुंबाची, पुढच्या पिढीची मानसिकता ही बदलली पाहिजे. त्यासाठी आता नवीन क्षेत्रामध्ये जायचा निकाल हा घ्यावा लागेल.
आज तुमच्या भागातून जाताना नेहमी ही जी नर्सरी बघायला मिळते. आज इथली रोपं अनेक ठिकाणी जात असतात. एक नवीन धंदा काढला, स्थानिक लोकांनी काढला. त्यासाठी आंध्रच्या लोकांची मदत घेतली, तेलंगणाच्या लोकांची मदत घेतली. आज एका वेगळ्या धंद्याला सुरुवात झालेली आहे. मणिभाईंनी शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसायामध्ये अधिक लक्ष घातलेलं होतं. त्याचा परिणाम हा सुंदर झाला. त्यांनी काम करत असताना हे जे विर्य आहे, त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल? याप्रकारचा निर्णय घेतला आणि एक प्रकारची देशामध्ये धवल क्रांती, दुधाची क्रांती झाली म्हणतो. त्याच्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं होतं आणि त्याचं केंद्र हे त्याठिकाणी होतं. मला आठवतंय की, त्यांच्या संस्थेमध्ये देशातले अत्यंत महत्वाचे लोक होते. मणिभाई हे संस्थापक असतील. पण तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. त्याच्यामध्ये संचालक किंवा ट्रस्टी यशवंतराव चव्हाण होते, वसंतराव नाईक होते. जी माणसं राज्य आणि देश चालवतात ते उरूळी कांचनच्या या संस्थेमध्ये सहभागी झालेले होते. त्याचं महत्वाचं कारण हे जमिनीवरचं प्रश्न आहे. दिवसेंदिवस शेतीवर होणारा ताण हा लक्षात घेऊन त्यात बदल केले पाहिजेत. त्या बदलाची सुरुवात मणिभाई इथे करत असतील, त्याला हातभार लावला पाहिजे. म्हणजे तो विचार हा राज्यात आणि देशात सर्वत्र जाईल. त्या दृष्टिकोनातून उरुळी कांचनकडे बघण्याचा दृष्टिकोन या ज्येष्ठ नेत्यांचा होता.
आज राजकारणामध्ये वेगळे दिवस आहेत. यश- अपयश हे अनेकवेळा येत असतात, त्याची फारशी चिंता करायची नसते. राज्य बदलत असतात, नवीन राज्यकर्ते येत असतात. पण राज्य हातात आल्यानंतर देशाचं ‘सामाजिक ऐक्य’ याच्यात तडजोड करायची नसते. ज्या दिवशी याच्यात तडजोड केली जाईल, त्याची किंमत समाजातल्या शेवटच्या माणसाला ही अधिक द्यावीच लागते. त्या दृष्टिकोनातून हे बदल लक्षामध्ये घेतले पाहिजेत. ‘शेती एके शेती’ ही तर आपण करतो, पण निव्वळ शेती करून चालणार नाही. उद्योगधंद्यात लक्ष घालावं लागेल आणि तेही जाणीवपूर्वक वाढवायचं काम महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाने केलेलं होतं. मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये शिकत असताना एक दिवशी पिंपरी-चिंचवड भागामध्ये काही कार्यक्रमासाठी गेल्यानंतर टेम्पोचा कारखाना त्या ठिकाणी उभं राहतंय, असं दिसलं. अधिक माहिती घेतली, तो कारखाना उभा राहिला. हा कारखाना उभा राहिला कसा? एकेकाळी पुणे शहर हे विद्येचं माहेरघर होतं. आज विद्येचं माहेरघर आहे, पण हे दुय्यम स्थान आहे. आज त्या ठिकाणी कारखानदारी वाढली.
महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर व यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये औद्योगीकरण केलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी कटाक्षाने मांडली. एक काळ असा होता की, मुंबई ही औद्योगिक नगरी. या मुंबई शहरामध्ये ११० कापडाच्या गिरण्या होत्या. आज १ आहे, बाकीच्या गिरण्या गेल्या. कुठे मालेगावला आहे, कुठे भिवंडी रोडला आहे, कुठे इचलकरंजीला आहे. आज टेक्स्टाईलचा धंदा मुंबईतून गेला. मग मुंबईत आलं काय? मुंबईत असं आलं ‘व्हाईट कॉलर जॉब’ ऑफिसे, निर्यात (Export) या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी लोक आली. त्यामुळे त्याचा चेहरा बदलला. ही मुंबई जशी बदलली, तशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वानं पुण्याचा बदल हासुद्धा करायचा होता. मगाशी मी सांगितलं की, चव्हाण साहेबांनी बैठक बोलावून “पुणे हे विद्येचं केंद्र जपूया. पण इथली कारखानदारी वाढली पाहिजे” हा निकाल घेतला. त्याच्यामध्ये टेम्पो आले, बजाज आले, किर्लोस्कर आले व अनेक कारखाने पुण्याच्या आजूबाजूला झाले. आज ती केंद्रित कारखानदारी याच्या काही समस्या असतात. गर्दी होती, रस्त्याने आज इथून अनेकदा जाणंसुद्धा अवघड होतं. संध्याकाळी सहाच्या आसपास निघायचं झालं इथून पुण्याला तर तास- दीड तास लागतो. चाकणवरून पुण्यात यायला तास- दीड तास लागतो, वाघोलीवरून पुण्यात यायला तास- दीड तास लागतो. हे कशामुळे घडलं? हे घडलं कारखानदारीमुळे, वाढलेल्या प्रगतीमुळे. म्हणून आता माझ्याकडे राज्याची सत्ता आल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय मी घेतला की, कारखानदारी केंद्रित होऊ द्यायची नाही. झाली पुण्यात ठीक आहे, आता पुणे नाही. मग कुठे काढूया? जेजुरीला काढूया, बारामतीला काढूया, इंदापूरला काढूया, रांजणगावला काढूया, चाकणला काढूया, शिरूरला काढूया आणि ही कारखानदारी आज विकेंद्रीत स्वरूपात झाली. त्यामुळे त्या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळालं. चित्र बदललं आणि कारखानदारी उभी राहिली. रांजणगावला गेल्यानंतर लक्षात येत नाही, आपण कुठे आहोत? जगातल्या अनेक देशांतील कारखाने तिथे आहेत.
आज तुम्ही हिंजवडीला जा, तुम्ही न्यूयॉर्कला गेलं असं वाटतं. हजारो मुलं मुली आज त्या ठिकाणी काम करतात. सबंध हिंजवडी आणि तो भाग बदललेला आहे. हेच चित्र वाघोलीचं अलीकडे होणार आहे. आणखी काही दिवसांनी जे कारखाने विशेषतः आयटी इंडस्ट्री ही त्या ठिकाणी येतेय. त्याचा चमत्कार हा दिसेल आणि हे चित्र चाकणच्या आजूबाजूला आपण सर्वजण बघू. पण त्याच्यातून एका गोष्टीचा विचार हा तुम्ही- आम्ही सगळ्यांनी बसून करावा लागेल. तो म्हणजे कंजेशन! याचा अर्थ एका विशिष्ट वेळेमध्ये प्रवासाला जात असताना वाहनांची गर्दी! आज इथून जायचं म्हटल्यावर कठीण आहे. चाकणवरून यायचं कठीण आहे, संध्याकाळच्या वेळेला. कालच मी अहमदनगरवरून येत होतो आणि वाघोलीच्या पुढे गेल्यानंतर खराडीपर्यंत काय चित्र होतं? आता माझी गाडी पोलिसांनी काढली, त्यामुळे ठीक आहे. पण बाकीच्या लोकांना तास- तास दोन- दोन तास थांबावं लागतं, त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हासुद्धा एकप्रकारे विकासाच्या दृष्टीने वाईट होत असतो. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. ते करायचं असेल तर, स्थानिक विकासाच्या कामांमध्ये लक्षकेंद्रित करणं, हे सूत्र विसरून चालणार नाही. उरुळी कांचनचं वैशिष्ट्य हे आहे की, बाकीच्या काहीही गोष्टी असतील. पण विकासाच्या कामांसाठी लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन सहकार्य करून प्रश्नांची सोडवणूक करतात.
मला आठवतंय, इथली शिक्षण संस्था! मीच अध्यक्ष होतो त्याचा. अशीच एक बैठक होती आणि गावामध्ये चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर काही शैक्षणिक केंद्र इथे वाढवलं पाहिजे, ही मागणी या ठिकाणी केली गेली. आम्ही काही लोकांशी समन्वय साधला. महाराष्ट्रामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये ‘शिर्के’ नावाची एक मोठी कंपनी आहे, त्यांना विनंती केली. मला वाटतं, त्यांनी एक शाळा इथे बांधून दिली. त्याच्यानंतर आमचे मुंबईचे मित्र होते दिलीप संघवी! त्यांना विनंती केली, त्यांनी उरुळी कांचन पाहिलंही नव्हतं. पण नंतर त्यांनी या ठिकाणी वास्तू बांधून ठेवली. त्याच्यानंतर माझा एक वर्गमित्र सायरस पुनावाला! त्यालाही सांगितलं. त्याने इंग्लिश मीडियमची एक उत्तम शाळा या ठिकाणी केली. मी बघतो कधी-कधी रस्त्याने जात असताना मी तुम्हाला भेटत नाही. पण शाळेतून बाहेर येणारी किंवा जाणारी मुलं- मुली बघितल्यावर मी गाडी थांबवतो. त्यांना दोन प्रश्न विचारतो. मला एक गोष्ट बघायला मिळते की, त्या ‘पूनावाला स्कूल’मधून बाहेर आलेली मुलं- मुली सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातली. आत्मविश्वासाने बोलतात, इंग्रजीत बोलतात. चित्र बदलतंय, त्याचं कारण व्यवसायाच्या बरोबर शैक्षणिक दालन विकेंद्रीत स्वरूपामध्ये उभं करायला तुम्ही सर्वांनी साथ दिली. त्यामुळे हे सगळं या ठिकाणी घडू शकलं. याच रस्त्याने आपल्याला जायचंय.
आज संस्था नीट चालल्या पाहिजेत. संस्थांची चर्चा न केलेलीच बरी. आम्ही काही निर्णय घेतले, ते निर्णय फायद्याचे आहेत. पण काही लोकांना त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ माझ्याकडे सत्ता असताना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना आरक्षण ठेवलं. हा कायदा ज्या वेळेला मी केला, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये आम्हा लोकांना मार बसला. मी नंतर चौकशी केली की, का मार बसला? भोर तालुक्यामध्ये जात असताना एके ठिकाणी पारावर दहा-वीस माणसं बसली होती. मी गाडी थांबवली त्यांना विचारलं, काय केलं निवडणुकीत? “नाही आम्ही तुमचेच आहे, पण या वेळेला मात्र दुसरं केलं” मी म्हटलं का केलं? म्हटले “गेले ३० वर्ष आमच्या घरात सरपंचकी होती, आता तुम्ही कुठल्या बाईला सरपंच केलं. आम्हाला तिच्या मागं मागं जावं लागतंय” मी म्हटलं जाऊ नको. पण आपल्या हातातली सत्ता गेली तर त्या काळात ते लोकांना आवडलं नाही. पण आज ते चित्र नाही. आज स्त्री आणि पुरुष यांच्यात अंतर राहिलेलं नाही. थोडं अंतर ऐकतो मी, खरं खोटं माहीत नाही. पाच वर्षांचा जो काळ असतो तो वाटून घेता तुम्ही. एक- एक वर्षांसाठी वगैरे.. असं काही आहे का इथं? इथलंच मी ऐकलं आहे. तर शक्यतो हे टाळलं पाहिजे. जबाबदारी कुणाला द्यायची? त्याचा निर्णय तुम्ही घेतला. एक कालखंड संपेपर्यंत त्यांच्यामागं उभे रहा. त्यांच्यामागं उभं राहून विकासाच्या कामांना गती द्या.
आज या ठिकाणी हे ‘ग्रामसचिवालय’ बांधलंय. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करेन, ही अतिशय उत्तम वास्तू आहे. देखणी वास्तू आहे, गावाच्या सौंदर्यात भर आहे. पण ही वास्तू देखणी असल्याचं आनंद तुम्हाला मला आहे. पण या ग्रामस्थांचा प्रश्न आहे, तो प्रश्न सहज तिथे सुटला तर त्याला त्या वास्तुबद्दल अधिक आदर वाढेल. त्यामुळे जे कोणी सत्तेवर येतील, ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी त्या दृष्टीने काम करावं एवढीच लोकांची अपेक्षा आहे. मला आनंद आहे की, इथे आज या निमित्ताने येता आलं. एक ग्रामपंचायतीचं नेतृत्व ऋतुजा आणि त्यांच्या सगळ्या भगिनी व सहकारी करतायत, याचा अतिशय मनापासून आनंद झाला. संधी मिळाली तर कर्तुत्वाच्या बाबतीत स्त्री कधीही मागे राहत नाही. त्यांना संधी दिली पाहिजे.
मी नेहमी सांगतो की, आम्ही सात जणं भाऊ एका कुटुंबामध्ये! माझी आई ही कर्तबगार बाई होती. १९३६ साली काँग्रेसच्या तिकिटावर लोकल बोर्डावर निवडून आली होती. त्यावेळी जिल्ह्याला एक जागा असायची महिलांना. पण त्या काळातसुद्धा आम्ही सगळे पुण्याला शिकायला. आमची आई काटेच्यावाडीला जाऊन रोज सकाळी एसटीने आमच्या जेवणाचा डबा पाठवायची. त्यानंतर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांनी लोकल बोर्डाची बैठक असली की, ती बैठक सोडली की आमच्या कॉलेजला जाऊन आम्ही काय उचापती करतोय? हे बघायचं. नक्की अभ्यास करतो की नाही? याचं आता त्याच्या काही खोलात जात नाही. पण त्याचा परिणाम एक सांगतो की, ज्या घरात सातवी पास शिक्षण नव्हतं. माझे मोठे बंधू हयात नाहीयेत, एल. एल. बी. होते. दुसरे कृषी पदवीधर होते, अप्पासाहेब पवार. तिसरे अजितचे वडील, तेही या सगळ्या क्षेत्रात काम करत होते. त्याच्यानंतरचे अमेरिकेला जाऊन इंजिनियर होऊन आले, इथे इंडस्ट्री काढली. त्याच्यानंतर इंग्लंडला जाऊन आर्किटेक्ट झाले, इथे व्यवसाय सुरू केला. राजकारणात पडल्यामुळे या सगळ्या कामात वाया गेलेला एक मुलगा होता, त्याचं नाव ‘शरद पवार’ आणि त्याच्यानंतर धाकटे भाऊ होते, ते ‘सकाळ’चे आज चेअरमन आहेत. या सगळ्या संस्था उभ्या करायला दृष्टी कोणाची होती? तर आईची होती. आश्चर्य वाटेल, कधी कधी गंमत वाटते की, आम्हा सात भावांमध्ये तीन लोक ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ आहेत. ही संधी कधी मिळत नाही. त्यामुळे मातेचे संस्कार हे अत्यंत महत्वाचे असतात. मातेचे संस्कार अत्यंत महत्वाचे असतील तर, समाजामध्ये मातेची प्रतिष्ठा ही जाणीवपूर्वक सांभाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. समाज बदलतो, बदलेल त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. याच रस्त्याने जाण्याची भूमिका आपण घेऊया. मला आनंद आहे की, या सगळ्यांच्या समवेत आज मला या ठिकाणी तुमच्याशी सुसंवाद करण्याची संधी मिळाली. तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो…. शरद पवार