‘५४२६ कोटींची कंत्राटं अन् पडद्यामागे कोण?’ जरांगेंवर बारस्करांचा गंभीर आरोप; विखे-पाटलांशी संबंधांचा दावा

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती आता गंभीर आरोपांची नवी चर्चा सुरू झाली आहे. माजी सहकारी अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे, काही कंत्राटदार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील कथित संबंधांवर थेट सवाल उपस्थित केले. ‘जरांगे आता संघर्षयोद्धा राहिले नाहीत, ते टेंडर योद्धा झाले आहेत,’ अशी टीका करत बारस्कर यांनी तब्बल ५४२६ कोटी रुपयांच्या कंत्राटांचा दावा केला.
बारस्कर यांच्या आरोपानुसार, जरांगे यांच्या जवळच्या व्यक्तींचा समावेश असलेली एक टोळी कंत्राटे मिळवण्याचे काम करत आहे. किशोर बलांडे यांचा या कथित व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. बलांडे हे जरांगे यांच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर कसे पोहोचले आणि विखे पाटील यांच्या वाहनातून आंदोलनस्थळी कसे आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी संजय कटारे यांच्यावरही बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. मार्च २०२३ मध्ये चार कोटी रुपयांहून अधिक किमतीची वाळू चोरी केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. कटारे हे काळ्या यादीतील कंत्राटदार असून त्यांना १४ कोटी रुपयांची कामे मिळाल्याचा आरोपही करण्यात आला. जरांगे यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींवरही वाळू चोरीचे आरोप करत बारस्कर यांनी काही जमीन व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला.


३७७० कोटींच्या निविदांवर प्रश्नचिन्ह?
बारस्कर यांच्या दाव्यानुसार, संबंधित मंडळींनी सुमारे ३७७० कोटी रुपयांची कंत्राटे मिळवली. गरज नसलेल्या कामांची यादी तयार करणे, अंदाजपत्रके फुगवणे आणि निविदा व्यवस्थापित करणे असे प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे ८२ कोटी रुपये बलांडे आणि मेंगरे यांना दिल्याचा दावाही त्यांनी केला.
विखे पाटील यांच्या माध्यमातून ‘माणिक इन्फ्रास्ट्रक्चर’ला ६३५ कोटी रुपयांची कामे मिळाल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला. कमी दरात काम करण्यास तयार असलेल्या कंपन्यांना बाजूला करण्यात आल्याचा दावा करत, अवघ्या तीन वर्षांच्या कंपनीला एवढी मोठी कामे का देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जरांगेंच्या जुन्या चर्चांवरही सवाल
जरांगे यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत बंद खोलीत काय चर्चा केली, तसेच विखे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना बाहेर का काढण्यात आले, असे प्रश्न बारस्कर यांनी उपस्थित केले. जरांगे यांच्या नातेवाईकांच्या जमीन व्यवहारांवरही त्यांनी संशय व्यक्त केला.
या सर्व आरोपांची कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे देणार असल्याचे बारस्कर यांनी सांगितले. जरांगे हे विखे पाटील यांचे माणूस असल्याचाही त्यांनी आरोप केला. तसेच स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांकडून सुरक्षा मिळत नसल्याचा दावा केला. दरम्यान, बारस्कर यांच्या या गंभीर आरोपांवर मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित कंत्राटदारांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
