दिल्ली स्फोटाची गुपिते उलगडली ; डीएनए चाचणीतून धक्कादायक उलगडा, कारमधील मृतदेह……

दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या भीषण कार स्फोटामागे कार्यरत असलेल्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’चा उलगडा झाला आहे. या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार आणि स्फोटकांनी भरलेली ह्यूंडई आय२० कार चालवणारा दहशतवादी डॉक्टर उमर नबीच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर नबी भट हा मूळचा पुलवामा येथील रहिवासी होता. तो एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता. तयाने श्रीनगरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि त्यानंतर एमडीची पदवी मिळवली होती. नीट-पीजी परीक्षेतही तो अव्वल ठरला होता. फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये तो सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याच्यासारखा उच्चशिक्षित व्यक्ती दहशतवादाकडे वळल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या कारच्या स्फोटाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.स्फोट झालेल्या कारच्या ढिगाऱ्यात सापडलेला जळालेला मृतदेह हा उमरच्या कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांशी जुळला असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये ब्लास्ट झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० पेक्षा जास्त जखमी झाले होते. या स्फोटानंतर गृहमंत्रालयाकडून तात्काळ उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेऊन सूचना कऱण्यात आली.
या कार स्फोटामागे कार्यरत असलेल्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’चा उलगडा झाला आहे.या मॉड्यूलमध्ये फक्त डॉक्टरच नव्हे, तर मौलवी आणि इतर उच्चशिक्षित तरुणही सामील होते. जम्मू आणि काश्मीर ते हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत या नेटवर्कचा विस्तार होता. यातील सदस्य एनक्रिप्टेड ॲप्स आणि टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून कट्टरपंथी बनले होते. फरीदाबाद येथील शैक्षणिक संस्थांना त्यांनी आपल्या कारवायांचे केंद्र बनवले होते. उमर नबी व्यतिरिक्त, अल-फलाह युनिव्हर्सिटीमधील दुसरे डॉक्टर मुझम्मिल अहमद गनाई आणि डॉ. आदिल मजीद राथर यांनाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मुझम्मिलच्या चौकशीतून फरीदाबाद येथे स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एका ठिकाणी तब्बल २,९०० किलो स्फोटके सापडली होती, ज्यामुळे या मोठ्या हल्ल्याच्या तयारीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
