जंगलात अचानक किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ! चंद्रपुरात वाघिणीचा रक्तरंजित हल्ला; ४ महिलांचा जागीच मृत्यू


चंद्रपूर : काही महिला तेंदूपत्ता तोडण्यात व्यस्त होत्या… कुणी गप्पा मारत होतं, तर कुणी पानं गोळा करत होतं. पण काही क्षणांतच शांत जंगलात भीषण किंकाळ्या घुमल्या आणि सगळं चित्र बदललं. झुडपात दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक महिलांच्या समूहावर झडप घातली. जीव वाचवण्यासाठी महिला जंगलात सैरावैरा पळू लागल्या, मात्र चार महिलांना मृत्यूने जागीच गाठलं. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे.

गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रातील खैरीचक परिसरात शुक्रवारी सकाळी हा भीषण प्रकार घडला. गुंजेवाही गावातील भट्टी मोहल्ला परिसरातील तब्बल १३ महिला जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या एका मादी वाघिणीने अचानक महिलांच्या समूहावर झडप घातली. हल्ला इतका वेगवान आणि भयानक होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही.

या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर महिलांनी जीवाच्या आकांताने पळ काढत स्वतःचा जीव वाचवला. आपल्या डोळ्यासमोर सहकाऱ्यांना वाघिणीने ओढून नेत असल्याचे दृश्य पाहून बचावलेल्या महिला अजूनही धक्क्यात आहेत. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच परिसरातील आणि नातेवाईक असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

कविता दादाजी मोहुर्ले (45)

अनिता दादाजी मोहुर्ले (46)

संगीता संतोष चौधरी (40)

सुनीता कौशिक मोहुर्ले (35)

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने जंगल परिसराकडे धाव घेतली. संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिसांचा ताफा आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, हल्लेखोर वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलालगतच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!