पालखी महामार्गाच्या कामात मोठा घोटाळा? कामात चक्क प्लास्टिकचे गज वापरले, अजितदादांच्या काटेवाडीतील प्रकार…

बारामती : येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामात मोठा घोटाळा झाला असल्याचे दिसून आले आहे. या गटारासाठी लोखंडी गज (सळई) वापरण्याऐवजी प्लास्टिकचे गज वापरण्यात येत आहेत. यामुळे याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. गजाला वरून काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचे दाखवले जात आहे.

या कामात पूर्वीच्या टप्प्यात लोखंडी गजांचा वापर करण्यात आला होता, मात्र आता प्लास्टिकचे गज वापरण्यात येत आहेत. हे गज जरा जोरात दाबले किंवा दुमडले तर तुकडे होत आहेत. यामुळे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काटेवाडी येथील नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहेत. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
या पाईप मधून प्लास्टिकचा कचरा बाहेर येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दर्जाहीन होत असून, भविष्यात मोठा अपघात किंवा नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, गटाराच्या कामात प्लास्टिक गज वापरण्यास परवानगी आहे का, याबाबत देखील शासकीय नियमांबाबत संबंधितांनी खुलासा करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काटेवाडीतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या टेंडरमध्ये प्लास्टिकच्या रॉडचा अंतर्भाव असल्यास आम्हाला ते दाखवावे. अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा वसंतराव जगताप आणि अभयसिंह निंबाळकर यांनी दिला आहे. तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार इंझेंडे पाटील म्हणाले की, प्लास्टीकचे गज वापरणे अत्यंत चुकीचे आहे. दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभाग महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासतो. याबाबत संबंधित विभागाने पालखी महामार्ग कामाच्या तपासणीची गरज आहे.