Sangli Accident : मध्यरात्री अंधारात अल्टो कालव्यात कोसळली, सहा जणांचा मृत्यू, मृतदेहाजवळ तरुणी रात्रभर बसून, नेमकं काय घडलं?

Sangli Accident : सांगलीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परत येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कुटुंबाच्या कारला अपघात झाला . यात ६ जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली.
राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय. ६०), सुजाता राजेंद्र पाटील (वय. ५५), प्रियांका अवधूत खराडे (वय. ३०), ध्रुवा (वय. ३), कार्तिकी (वय. १), राजवी (वय. २) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले (वय. ३०) या जखमी झाल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. हे तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला. Sangli Accident


मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गाडीचा अपघात झाला आणि गाडी कालव्यात कोसळली. या घटनेत वरील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास गाडी थेट कालव्यात कोसळल्याने व रस्त्यावरून वाहने कमी असल्याने कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे स्वप्नाली भोसले या गाडीतच बसून होत्या.
दरम्यान, बुधवारी पहाटे एका व्यक्तीला कालव्यात पडलेली गाडी दिसल्यावर हा अपघात झाल्याचे कळले. यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी महिलेला दवाखान्यात भरती केले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.