कांद्याची आवक घटली तरी दर कोसळले! लासलगाव, पिंपळगाव, येवल्यात मोठी घसरण; शेतकऱ्यांची चिंता वाढली

नाशिक : कांद्याची आवक कमी झाली असतानाही बाजारभावात झालेली घसरण सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी चांगला दर मिळत असल्याने दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा बाजारभावाचे संकट उभे राहिले आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात १६ सप्टेंबरच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वाधिक फटका बसला असून कांद्याचा कमाल दर तब्बल ८०० रुपयांनी घसरला आहे. १६ सप्टेंबरला ६ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला कमाल दर आता ५ हजार ७०० रुपयांवर आला आहे. २१ सप्टेंबरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार येथे १६ हजार ८७५ क्विंटल कांद्याची आवक झाली असून सर्वसाधारण दर ४ हजार ३०० रुपये राहिला.

लासलगावमध्येही कांद्याच्या सरासरी दरात ४०० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. १६ सप्टेंबरला ४ हजार ५०० रुपये असलेला सरासरी दर आता ४ हजार १०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात ६०५ रुपयांची घसरण झाली असून ५ हजार २५१ रुपयांवर पोहोचलेला दर आता ४ हजार ६४६ रुपयांवर आला आहे.


या दरघसरणीमागे बाजारातील बदललेले आवक-मागणीचे गणित महत्त्वाचे ठरत आहे. दक्षिणेकडील भागातून नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातून जुन्या उन्हाळी कांद्याची आवकही वाढत असल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात कांद्याचे दर दबावाखाली आले आहेत.
विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा उत्पादकांना होती. मात्र, बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या कांद्यामुळे बाजारातील स्पर्धा वाढली आणि त्याचा परिणाम नाशिकच्या कांद्याच्या दरावर झाला. आवक कमी असूनही दर घसरत असल्याने उत्पादन खर्च, वाहतूक आणि बाजारातील अनिश्चितता यांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
दरम्यान, २१ सप्टेंबरला विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात फरक दिसून आला. सोलापूरमध्ये कमाल दर ६ हजार ४०० रुपये, चंद्रपूर-गंजवडमध्ये ६ हजार २०० रुपये, तर पिंपळगाव बसवंतमध्ये ५ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आले. लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याला ५ हजार १५१ रुपये आणि कळवणमध्ये ५ हजार ३७२ रुपये कमाल दर मिळाला.
आता पुढील काळात दक्षिणेकडील नवीन लाल कांद्याची आवक, मध्य प्रदेशातील उन्हाळी कांद्याची उपलब्धता आणि नाशिकच्या कांद्याला मिळणारी मागणी यावर बाजारभावाची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या घसरलेल्या दरानंतर बाजार पुन्हा कधी सावरतो, याकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.