सत्तरीतलं प्रेम ठरलं जीवघेणं! प्रियकराची हत्या, शेतात अर्धवट जाळलं; दीड महिन्याने DNA रिपोर्टने उघडलं रहस्य

सोलापूर : सत्तरीच्या उंबरठ्यावर फुललेल्या प्रेमसंबंधाचा शेवट इतका भयंकर होईल, याची कल्पनाही कुणाला नसेल. पंढरपूर तालुक्यात अंबादास खांडेकर (७०) आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, २७ जुलै रोजी दोघांमध्ये झालेल्या वादाने टोक गाठलं आणि अंबादास यांच्या हत्येचा आरोप मंगल होनमाने यांच्यावर आहे. त्यानंतर मृतदेह शेतात अर्धवट जाळण्यात आल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनलं.
या घटनेनंतर २ ऑगस्ट रोजी काही गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. मृतदेहाची अवस्था पाहता त्याची तात्काळ ओळख पटवणे कठीण होते. दरम्यान, अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांनी अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेतले. तब्बल दीड महिन्यानंतर अहवाल प्राप्त झाला आणि शेतात सापडलेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ओळख पटताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर अवघ्या १२ तासांत मंगल होनमाने यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


पोलिसांच्या तपासानुसार, प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान मंगल यांनी हत्या केल्याची कबुली दिल्याचे काही वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. मात्र, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा सविस्तर उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.
सत्तरीतील दोन व्यक्तींमधील प्रेमसंबंध, त्यानंतरचा वाद, शेतात झालेली हत्या, अर्धवट जाळलेला मृतदेह आणि तब्बल दीड महिन्यानंतर डीएनए अहवालातून झालेली ओळख यामुळे या प्रकरणाने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.