दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; NCMC कार्डच्या नियमात मोठा बदल, कोणाला मिळणार सवलत?

पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे किंवा देवदर्शनाला जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसटीच्या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड असणे बंधनकारक राहणार नाही. महामंडळाने NCMC कार्डची सक्ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत शिथिल केली आहे. त्यामुळे अद्याप कार्ड नोंदणी न केलेल्या पात्र प्रवाशांनाही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारकडून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र सामाजिक घटकांना एसटी प्रवासात तिकिटावर सवलत दिली जाते. या सवलतीची रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला दिली जाते. मात्र, सवलत योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र प्रवाशांना NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने अनेक प्रवाशांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत होता.
31 डिसेंबरपर्यंत NCMC कार्डची अट शिथिल
NCMC कार्डच्या अंमलबजावणीतील अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत पात्र प्रवाशांना कार्डशिवायही तिकीट सवलतीचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी आदेश जारी केले आहेत.

मात्र, ही सवलत तात्पुरती असून 1 जानेवारी 2027 पासून एसटी प्रवासातील सवलतीसाठी पुन्हा NCMC कार्डची अट लागू होणार आहे.
राज्यातील साडेतीन हजार केंद्रांवर कार्ड वितरण

NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी राज्यभरात सुमारे साडेतीन हजार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवास सवलतींची नोंद ठेवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना
राज्यात महिला प्रवाशांची संख्या मोठी असली तरी आतापर्यंत केवळ 1.10 कोटी NCMC कार्डची नोंदणी झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना या योजनेची माहिती नसल्याने त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून कार्ड नोंदणी आणि वितरण करण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के NCMC नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे सध्या पात्र प्रवाशांना कार्ड नसले तरी एसटीच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
