ऊसदरवाढीप्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे रास्ता रोको आंदोलन अखेर स्थगित; ऊस उत्पादकांना ४२०० रुपये दर मिळण्याचा मार्ग मोकळा!


पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. ऊसाला प्रतिटन 4,200 रुपये देण्याच्या मागणीवर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये तोडगा निघाला आहे. यानुसार पहिली उचल 3,900 रुपये, हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी 200 रुपये देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयानंतर तब्बल 61 तासांपासून सुरू असलेले चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावर केली. तसेच उद्या पुकारण्यात आलेला बंदही स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमका काय झाला तोडगा?
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. या बैठकीत कारखानदारांनी सुधारित दराचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला कारखानदारांकडून 3,800 रुपये आणि अतिरिक्त 200 रुपये असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, संघटनेने 4,500 रुपयांच्या मागणीवरून माघार घेत 4,200 रुपयांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.

अखेर पहिली उचल म्हणून 3,900 रुपये, हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी 200 रुपये असे एकूण 4,200 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. हा निर्णय साखरेचा दर प्रतिक्विंटल 4,500 रुपये गृहीत धरून घेण्यात आला आहे.

तसेच भविष्यात साखरेचा दर 4,500 रुपयांच्या पुढे गेल्यास अतिरिक्त उत्पन्नातील 70 टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर 30 टक्के हिस्सा कारखान्यांना देण्याचेही ठरले आहे.

61 तासांनंतर आंदोलन स्थगित; महामार्ग वाहतुकीसाठी खुला
ऊसाला पहिली उचल 4,500 रुपये मिळाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. या मागणीसाठी 3 नोव्हेंबरपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरू होते.

सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन दिवाळीत या आंदोलनाचा फटका एसटी वाहतुकीलाही बसला. कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 166 एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

मात्र, आता 4,200 रुपयांच्या दरावर तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मध्यरात्री 1 वाजता राजू शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!