कॉलेजला गेली, पण घरी परतली नाही; कदमवाकवस्तीतील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

लोणी काळभोर : येथील एका नामांकित विद्यापीठात शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणी कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली; मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नसल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली.
१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत तरुणी घरी न परतल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी ही लोणी काळभोर येथील एमआयटी गुरुकुल विद्यापीठात मानसशास्त्र विषयाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या शैक्षणिक अडचणींमुळे तिची आई कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन सोसायटीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिच्यासोबत राहत होती. तिचे वडील जम्मू येथील सिमेंट कारखान्यात नोकरीस आहेत.


नेहमीप्रमाणे ती बुधवारी (१६ सप्टेंबर) सकाळी सुमारे पावणेनऊ वाजता आईला कॉलेजला जात असल्याचे सांगितले आणि घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे आईने तिच्या मैत्रिणी, कॉलेजमधील सहकारी आणि परिचितांकडे चौकशी केली. मात्र, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
यानंतर आईने पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीय तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींनी लोणी काळभोर, हडपसर, नाना पेठ यांसह विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही.
तिच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे तरुणीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.