ठाकरेंच्या मोर्चाआधीच मोठा ट्विस्ट; ‘राज-उद्धवांना अटक करा’ म्हणत सदावर्तेंची थेट मागणी

मुंबई : निवडणूक आयोगाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असतानाच या ‘गर्जना मोर्चा’वरून नवा वाद पेटला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जात आहे. मात्र, मोर्चाला सुरुवात होण्याआधीच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अटकेची थेट मागणी केली आहे.
‘लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गर्जना’ या भूमिकेतून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे. या आंदोलनात मनसे, शिवसेना ठाकरे गटासह इतर विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, मोर्चाचा आधीचा मार्ग बदलण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा काढण्यात येणार आहे. मोर्चानंतर महापालिका मुख्यालयाजवळ जाहीर सभा होणार असून, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या सभेला संबोधित करणार आहेत.


मात्र, या मोर्चावर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ठाकरे बंधूंचा मोर्चा बेकायदेशीर आणि संविधानविरोधी असल्याचा दावा करत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
“संविधानाचं मुखपृष्ठ दाखवायचं आणि बेकायदेशीर मोर्चा काढायचा, हे चुकीचं आहे,” अशी टीका सदावर्ते यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच्या घरातूनच अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हा मोर्चा न्यायालयाचा अवमान ठरतो, असा दावाही त्यांनी केला.
सदावर्ते यांनी मुंबईतील नागरिक आणि रुग्णांच्या होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही उपस्थित केला. मागील आठवड्यात एका मोर्चामुळे मुंबईत हाल झाले, आता पुन्हा मोर्चामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये, असं त्यांनी म्हटलं. “आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नखरे सहन करू नयेत,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
याशिवाय, वंचित घटक, शेतमजूर किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर गुन्हे दाखल होत असतील, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळा कायदा का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. अनुसूचित जातीच्या मोर्चांवर गुन्हे दाखल होतात, मग ठाकरे बंधू कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आजच्या मोर्चाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार, तर दुसरीकडे मोर्चापूर्वीच सदावर्तेंची अटक करण्याची मागणी यामुळे या आंदोलनाला वेगळं राजकीय वळण मिळालं आहे. आता मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आणि सदावर्तेंच्या आरोपांवर त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर दिलं जाणार का, याची उत्सुकता आहे.
