‘२०२९ ला विधानसभेत दिसणार नाहीत…’; पाचपुतेंच्या एका आरोपाने रोहित पवार भडकले, थेट निवडणुकीचं चॅलेंज!


पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आंदोलनावरून भाजप आमदार विक्रम पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. पाचपुतेंच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवारांनी थेट २०२९च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत मोठं राजकीय आव्हान दिलं आहे. “२०२९ ला ही व्यक्ती विधानसभेत जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे,” असं रोहित पवारांनी विद्यार्थ्यांसमोर म्हटलं.

गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी आहेत. याच आंदोलनावरून विक्रम पाचपुतेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुण्यातील आंदोलन हे आता विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नसून ‘रोहित पवार नाईट्स’ सुरू असल्यासारखं चित्र आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. दिवसभर आंदोलनस्थळी केवळ ५० ते १०० लोक असतात आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, असा दावाही पाचपुतेंनी केला.

यापेक्षा गंभीर आरोप करताना पाचपुतेंनी रोहित पवार एमपीएससी आंदोलनाच्या आडून ‘अर्बन नक्षल’ तयार करण्याचं काम करत असल्याचं म्हटलं होतं. याच विधानाचा रोहित पवारांनी समाचार घेतला. “माझ्यावर टीका करण्याच्या नादात तुम्ही सामान्य कुटुंबातील मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गरीब मुलांना अर्बन नक्षल म्हणालात. या गोष्टीचा मी निषेध करतो,” असं ते म्हणाले.

“माझ्या भावाबहिणींना आणि सामान्य लोकांच्या मुलांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या तोंडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुम्ही माफी मागू शकता. पण आता सरळ तुम्ही असं बोललोच नाही, असं म्हणत आहात,” असं म्हणत रोहित पवारांनी पाचपुतेंना लक्ष्य केलं.

यानंतर त्यांनी थेट २०२९च्या निवडणुकीचं आव्हान दिलं. “तुम्हाला सर्वांना शब्द देतो की, २०२९ ला ही व्यक्ती विधानसभेत जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे,” असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या या वक्तव्याने राजकीय चर्चेला वेगळंच वळण मिळालं.

रोहित पवारांच्या या विधानानंतर अजित पवारांच्या जुन्या राजकीय चॅलेंजचीही चर्चा सुरू झाली आहे. पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांच्याबाबत अजित पवारांनी २०१९च्या निवडणुकीपूर्वी “तू २०१४ मध्ये जिंकलास, पण २०१९ ला तू आमदार कसा होतो तेच बघतो,” असं म्हटलं होतं. त्यानंतर शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे रोहित पवारांचं पाचपुतेंना दिलेलं आव्हान हे ‘अजितदादा स्टाईल’ इशारा असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, रोहित पवारांच्या वक्तव्यावर विक्रम पाचपुतेंनीही पलटवार केला आहे. रोहित पवारांच्या राजकीय अहंकाराचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ देऊ नये, असा टोला त्यांनी लगावला. “स्वतःचा इगो जपण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा राजकीय प्रतिष्ठेचा विषय होऊ नये,” असं पाचपुते म्हणाले.

“हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे की स्वतःचा इगो जपण्यासाठी, याचा विचार आता रोहित पवारांनीच करावा,” असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, एमपीएससी आंदोलनावरून रोहित पवारांनी सरकारला दिलेला इशाराही चर्चेत आहे. एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या राजीनाम्यावर निर्णय झाला नाही, तर पुणे शहर बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मात्र, एमपीएससी अध्यक्षांच्या पदाबाबत घटनात्मक प्रक्रिया आणि अधिकारांचा मुद्दाही समोर आला आहे. राज्य सरकारला अध्यक्षांना थेट हटवण्याचा अधिकार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या दाव्यानंतर सरकार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे एमपीएससीच्या मागण्यांवरून आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे रोहित पवार आणि विक्रम पाचपुते यांच्यातील शाब्दिक संघर्षाने राजकीय रंग घेतला आहे. त्यामुळे २०२९च्या निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!