बोगस बियाण्यांचा धोका वाढला; शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासाच, नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला

पुणे : खरीप हंगामातील पेरणीला वेग आला असताना राज्यातील काही भागांत बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतात उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मेहनत, वेळ आणि पैशांचा मोठा फटका बसत असल्याने बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

बाजारात काही वेळा नामांकित कंपन्यांच्या नावासारखी दिसणारी बनावट पाकिटे, जुने बियाणे नव्या पॅकिंगमध्ये विक्री करणे किंवा कमी दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे केवळ स्वस्त दर किंवा आकर्षक पॅकिंग पाहून बियाणे खरेदी करणे धोकादायक ठरू शकते.
शेतकऱ्यांनी बियाणे घेताना नेहमी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खरेदी करताना पक्के बिल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण बियाणे खराब निघाल्यास कंपनी किंवा विक्रेत्याविरोधात कारवाई करताना हे बिल महत्त्वाचा पुरावा ठरते. तसेच बियाण्याच्या पाकिटावरील कंपनीचे नाव, बॅच क्रमांक, प्रमाणपत्र टॅग, उत्पादन तारीख आणि अंतिम मुदत याची तपासणी करावी.

पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यास मोठे नुकसान टाळता येते. यासाठी १०० बियाणे ओल्या गोणपाटावर ठेवून त्यावर दुसरे गोणपाट टाकावे. सात दिवस नियमित पाणी शिंपडल्यानंतर बियाण्यांची उगवण तपासावी. यापैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक बियाण्यांना चांगले कोंब फुटले तर बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे मानले जाते.

तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची गुणवत्ता तपासून त्यानुसार बियाण्यांची निवड करणे गरजेचे आहे. जमिनीचा पोत, क्षारांचे प्रमाण, आम्लता आणि उत्पादन क्षमता लक्षात घेऊन योग्य वाण निवडल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते. बाजारात एखाद्या बियाण्याला जास्त मागणी आहे म्हणून तेच बियाणे प्रत्येक शेतासाठी योग्य असेलच असे नाही.
दरम्यान, बोगस बियाणे विक्री, जास्त दराने विक्री किंवा फसवणुकीबाबत शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करू शकतात. कृषी विभागाने यासाठी तक्रार व्यवस्था उपलब्ध करून दिली असून १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारींसाठी संबंधित माहिती आणि पुरावे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पेरणीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे बियाणे खरेदीतील छोट्या चुकीमुळे संपूर्ण हंगामाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य तपासणी करूनच बियाणे खरेदी केल्यास बोगस बियाण्यांच्या फसवणुकीपासून बचाव करता येऊ शकतो.