मांढरदेवी यात्रेनिमित्त प्रशासनाकडून नियमावली जाहीर, पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी….

सातारा : सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मांढरदेव येथे सालाबादप्रमाणे यंदाची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यासाठी आवश्यक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री काळेश्वरी देवीची पारंपरिक यात्रा होणार आहे. या यात्रा कालावधीत महत्त्वपूर्ण निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून, दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही.

तसेच मांढरदेवी येथील काळेश्वरी परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वारापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहेत, जेणेकरून हे नियम पाळले जातील. यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ढोल व वाद्यांच्या आवाजामुळे शेजारी काही अनुचीत प्रकार घडला, तरी काही एकू येत नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे, असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे. निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. यात्रेकरूंना या नियमांचे पालन करण्यास सांगितले जाईल.
काही वर्षांपूर्वी याठिकाणी एक अनुचित प्रकार घडला होता. त्यावेळी झालेल्या गोंधळात अनेकांचे प्राण गेले होते. यामुळे तेव्हापासून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. तसेच अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.
