राज ठाकरेंची SIR रद्द करण्याची मागणी; फडणवीसांनी 9 मुद्द्यांत दिलं उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले


मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत गर्जना मोर्चा काढला. महाराष्ट्रात करण्यात आलेला विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) रद्द करावा, तसेच यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असंही ते म्हणाले.

ठाकरे बंधूंसह विरोधकांकडून SIR विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत SIR संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची प्रक्रिया असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SIR 2026 संदर्भात फडणवीसांनी दिलेली महत्त्वाची माहिती

1. SIRपूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.

2. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

3. जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांचे संबंधित गणना प्रपत्र प्राप्त झालेले नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

4. अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपलं नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

5. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.

6. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.

7. ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.

8. प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून आपलं नाव तपासता येणार आहे.

9. योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपलं नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, गर्जना मोर्चात राज ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीवरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 2024 च्या निवडणुकीत महायुतीला संपूर्ण बहुमत मिळालं, मात्र महाराष्ट्रात जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये उत्साह नव्हता, संपूर्ण सन्नाटा होता; मग हा कोणता विजय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत एक कोटी मतं वाढली. तुमची इतकी मतं वाढली. आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

देशभरात मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असल्याचं सांगत राज ठाकरे म्हणाले की, मी 2017 पासून सांगतोय की मतचोरी सुरू आहे. याच मुद्द्यावर आपण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. मतांमध्ये चोरी होत असल्याचं आपण सातत्याने सांगत होतो आणि त्यावेळी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असंही म्हणत होतो, असा दावा राज ठाकरेंनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!