Rahul Kul : रात्रीच्या वेळी उडणाऱ्या ड्रोनची चौकशी करा, आमदार राहुल कुल यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र…

Rahul Kul : तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे तसेच काल सायंकाळी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून केली आहे.

याबाबत आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणाले आहेत कि, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात उडणारे ड्रोन हे नागरिकांच्या काळजीचा व चिंतेचा विषय बनत चालले आहेत.
हे ड्रोन हेरगिरी करीत आहेत काय असा संशय नागरिकांच्या मनात येत असून, यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. आकाशात उडणारे हे ड्रोन काल परवा रात्रीच्या वेळी माझ्या देखील निदर्शनास आले असून, याची चौकशी करून बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
