पुण्यातील सारसबागच्या पाडव्याच्या कार्यक्रमाला गालबोट ; पोलिसांसमोर दोन गटात तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

पुणे : गेल्या 28 वर्षांपासून पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाटचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यंदाच्या वर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र किरकोळ कारणावरून दोन गटात यावेळी हाणामारी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे सारसबागच्या दिवाळी पहाटच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला गालगोट लागला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सारसबाग येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात एकमेकांना धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण मिटवलं. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या धमकीवजा इशाऱ्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं.

दरम्यान आता पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर सारसबागेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.

