कुणाल कामराला पुणेकराचे चोख प्रत्युत्तर, फ्लेक्स लावून एकनाथ शिंदे यांचे कौतुक, नेमकं काय म्हणाले?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक पुण्यात लावला आहे. टिळक रस्त्यावर हा फ्लेक्स लावला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र काढले आहे.
यामध्ये ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए! अशा शब्दांत शिंदे यांचे कौतुक केले आहे. वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, गाण्यांच्या ओळी लिहीत शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला.
तसेच आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे म्हटले आहे.
तसेच हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये.
तसेच सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, असेही वैभव वाघ म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. असेही ते म्हणाले. यामुळे याचे वातावरण तापले आहे.