नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, पोलिसांकडून गुन्हा दाखल…

नाशिक : भोंदू अशोक खरात यांच्याविरोधातील प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा त्यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सिन्नर तालुक्यातील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर तब्बल ३२ बनावट खाती उघडून सुमारे ५७ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संचालक मंडळासह खरात याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावाचा गैरवापर करून अनेक खाती उघडण्यात आली आणि त्या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले.

दरम्यान, या व्यवहारांमधून जवळपास ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संबंधित पतसंस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात केवळ अशोक खरात यांच्यावरच नव्हे, तर पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही जबाबदारी निश्चित केली जात आहे. पोलिसांनी संचालक मंडळातील सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधितांकडून निष्काळजीपणा झाला की जाणीवपूर्वक सहभाग होता, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
दरम्यान, दुसरीकडे आर्थिक गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ईडी कडूनही कारवाईला वेग आल्याची माहिती समोर येत आहे. खरात यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती (अटॅचमेंट) येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीकडून संबंधित संपत्तीची तपशीलवार छाननी केली जात असून, संशयित व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे.