पुणेकरांनो लक्ष द्या! गुरुवारी पाणीपुरवठा बंद; तुमचा भाग आहे का यादीत?, जाणून घ्या..

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना… प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे की, आगामी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध जलकेंद्रांमध्ये तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऐन उन्हाळ्यात ही कामे होत असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीवर ३००० मिलीमीटर व्यासाचे नवीन फ्लो मीटर बसवण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे.
यासोबतच वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन टाकीच्या भिंतीचे कोअर कटिंग आणि अत्यावश्यक व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे एकाच वेळी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या दुरुस्ती सत्रामुळे पर्वती, वडगाव, लष्कर वारजे, चिखली, चतुःश्रुंगी आणि होळकर या सर्व प्रमुख जलकेंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही पाणी कपात लागू असेल, तर शुक्रवारी सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या निर्णयाचा परिणाम शहरातील अनेक भागांवर होणार असून वारजे, चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब परिसर, शिवणे औद्योगिक वसाहत, एसएनडीटी टाकी परिसर आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तसेच पर्वती परिसरातील अनेक भागांनाही या कपातीचा थेट फटका बसणार असून दुरुस्तीच्या कामांमुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.