पुणेकरांनो, १६ ऑक्टोबरनंतर पाण्याचं काय? आठवड्यातून एक दिवस नळ कोरडे राहणार? १० टक्के कपातीच्या आदेशाने वाढली चिंता


पुणे : पावसाने ओढ दिली आणि आता त्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात यंदा पर्जन्यमान घटण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना १० टक्के पाणीकपातीच्या तयारीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यातही पाणी कपातीची चर्चा सुरू झाली असून, १६ ऑक्टोबरनंतर नेमकं काय होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंत १० टक्के पाणीकपात सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, पुणे महापालिकेला या संदर्भातील अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या पुण्यात पाणीकपातीचा अंतिम निर्णय झालेला नाही.

आठवड्यातून एक दिवस नळाला पाणी नाही?

सरकारचा आदेश आल्यानंतर पुणे महापालिकेसमोर पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. १० टक्के कपात करायची झाल्यास आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे. हा निर्णय घेतल्यास पुढील जून २०२७पर्यंत तब्बल ४० दिवसांच्या पाण्याची बचत होऊ शकते.

सध्या पुणे महापालिका धरणांमधून दररोज सुमारे १,७५० एमएलडी पाणी उचलते. १० टक्के कपात केल्यास रोजच्या पाणीउपशात १७५ एमएलडीची घट करावी लागणार आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.

‘एल निनो’मुळे पाण्याच्या नियोजनाला वेग

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत धरणनिहाय आणि वापरनिहाय पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे.

पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाकडून मंजूर कोट्यानुसार पाणी मिळते. त्यामुळे उपलब्ध साठा आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले जात आहे.

अंतिम निर्णय कोण घेणार?

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकुमार जगताप यांनी अद्याप पाणीकपातीचा अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदेश आल्यानंतर महापालिका आयुक्तांसह महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडला जाणार आहे.

त्यामुळे पुणेकरांना आठवड्यातून एक दिवस पाणी मिळणार नाही का? १६ ऑक्टोबरपासून कपात सुरू होणार की निर्णय लांबणार? याचे उत्तर आता राज्य सरकारच्या आदेशानंतर आणि महापालिकेच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!