खुनाच्या थराराने पुणे हादरलं! मंगला चित्रपटगृहाबाहेर येताच तलवार कोयत्याने सपासप वार; टोळक्याच्या हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू..

पुणे : पूर्व वैमनस्यातून दहा ते बारा जणाच्या टोळक्याने तलवार, कोयत्याने सपासप वार करुन एका तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगला चित्रपटगृहाजवळ बुधवारी (ता.१६) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नितीन म्हस्के असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय ३२), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय २४), इम्रान शेख (वय ३२), पंडित कांबळे (वय २७), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय २४), लॉरेन्स पिल्ले (वय ३३), सुशील सूर्यवंशी (वय ३०), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय २५), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय २४), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय २०), विवेक भोलेनाथ नवधरे (वय २७), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय २१), विशाल भोले (वय ३०, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सतिश आनंदा वानखेडे (वय ३४, रा. ताडीवाला रोड) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ताडीवाला परिसरात टोळीच्या वर्चस्वावरुन दोन टोळ्यांमध्ये वारंवार भांडणे होत होती. फिर्यादी व नितीन म्हस्के हे गदर २ चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात आले होते. हे यल्ल्याच्या टोळीला समजले. ते चित्रपट सुटण्याची वाट पहात आऊट गेटला दबा धरुन बसले होते.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चित्रपट सुटल्यानंतर नितीन म्हस्के हा बाहेर आल्यावर लोकांच्या गर्दीत त्यांनी नितीनला घेरले.
त्याच्यावर डोक्यात, मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या व फरशीच्या तुकड्यांनी सपासप वार केले. त्याचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान , या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल , सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर , सहायक आयुक्त नंदा पाराजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे , शब्बीर सय्यद, विक्रम गौड हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.