पुण्यात विद्यार्थी आंदोलनांवर पोलिसांचा मोठा निर्णय! प्रमुख चौक ‘नो-प्रोटेस्ट झोन’; परवानगीशिवाय आंदोलन, सोशल मीडियावरील आवाहनही ठरणार गुन्हा
पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर वाढत असलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे आंदोलन, धरणे, मोर्चा किंवा रास्ता रोको करण्यास बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांशी संबंधित मागण्यांसाठी विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. अनेकदा रुग्णवाहिका, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन आदेशानुसार एफ.सी. रोड, जे.एम. रोड, बालगंधर्व चौक, अलका चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक तसेच नदीपात्र परिसरासह शहरातील संवेदनशील भागांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मनाई राहणार आहे. या भागांमध्ये अचानक जमाव जमवणे किंवा वाहतूक रोखणारी कोणतीही कृती केल्यास संबंधितांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

याशिवाय सोशल मीडियावरून आंदोलनाचे आवाहन करणाऱ्यांवरही पोलिसांची विशेष नजर असणार आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स किंवा इतर डिजिटल माध्यमांवरून विनापरवानगी आंदोलनासाठी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संघटनांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, आंदोलनाचा घटनात्मक अधिकार कायम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी त्यासाठी निश्चित ठिकाणांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलनासाठी अधिकृत ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आला असून, ओंकारेश्वर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पोलिसांच्या परवानगीनंतर मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाईल.
या निर्णयामुळे भविष्यात पुण्यातील विद्यार्थी आंदोलने अधिक नियोजनबद्ध आणि परवानगीच्या चौकटीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.