सोन्याच्या बाजारात मोठा उलटफेर! आठवडाभरात सोने-चांदीचे दर कोसळले; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : अमेरिका-इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता सोने-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीत अनेकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते आणि दर चढतात. मात्र, सध्या महागाई, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 42 हजार रुपये, तर 1 किलो चांदीचा दर 2 लाख 22 हजार रुपये इतका आहे.
विशेष म्हणजे, एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या सात दिवसांचा आढावा घेतला तर सोने 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची घट झाली आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका-इराणमधील तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती कायम राहील, तोपर्यंत सोन्याच्या दरावर दबाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा सोन्याच्या किमती वाढू शकतात.

सराफा तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, युद्ध किंवा राजकीय अस्थिरतेच्या काळात शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण होते. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. मागणी वाढल्याने अनेकदा सोन्याच्या किमतीत वाढ होते.
मात्र, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास जागतिक महागाई वाढते. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवण्याची शक्यता निर्माण होते. सोने हे व्याज न देणारी मालमत्ता असल्याने व्याजदर वाढल्यास सोन्याचे आकर्षण कमी होते.
याशिवाय, युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने इतर देशांसाठी महाग होते. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन दर घसरण्याची शक्यता वाढते.