अपघातानंतर रुग्णालय गाठण्यासाठी धावपळ संपणार? महाराष्ट्रातील महामार्गांवर हेलिकॉप्टरमधून मिळणार तातडीची मदत!


मुंबई : महामार्गावर भीषण अपघात झाला आणि रुग्णालय दूर असेल, तर जखमींच्या उपचारांसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे ठरते. आता अशा परिस्थितीत जखमींना लवकर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्रात हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ लक्षात घेऊन ही यंत्रणा उभारली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची भूमिका मांडली असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

१५ नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती तयार करून मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रारंभ मंजुरी आणि निविदा प्रक्रियेवर अवलंबून असेल.

समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांवर विशेष लक्ष

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या मार्गांवर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने गंभीर जखमींना ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था, उपचार केंद्रांची निवड आणि आपत्कालीन सेवांमधील समन्वय यावर भर दिला जाणार आहे.

तीन विभाग एकत्र, निधी आणि सेवापुरवठादारांवरही काम

हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभाग संयुक्तपणे कार्यपद्धती निश्चित करणार आहेत. सेवा पुरवणाऱ्या संस्थांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी स्पष्ट नियम बनवणे, या बाबींचाही आराखड्यात समावेश आहे.

या संदर्भातील बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी हजारो अपघात; वेळेत उपचारांवर भर

राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातानंतर वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांची उपलब्धता यामुळे उपचारांना विलंब होऊ शकतो. हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यास अशा गंभीर परिस्थितीत जखमींना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा आहे. आता या योजनेला मंजुरी कधी मिळते आणि सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!