शिवसेनेच्या निकालाची तारीख पुन्हा लांबणार? ठाकरे-शिंदे गटाच्या युक्तिवादात अजून किती अडथळे; असीम सरोदे यांनी सांगितलं कारण!


मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर नेमका कोणाचा अधिकार राहणार, तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय काय होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाचा निकाल दिवाळीपूर्वी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सुनावणीतील उर्वरित युक्तिवाद लक्षात घेता निकाल दिवाळीनंतर लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

१३ ऑक्टोबरला सुनावणी होऊ शकली नाही

शिवसेना प्रकरणाची सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी नियोजित होती. मात्र, न्यायमूर्ती व्ही. मोहना अनुपस्थित असल्याने सुनावणी झाली नाही. यापूर्वी ३० किंवा ३१ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होऊन निकाल येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, उर्वरित युक्तिवाद आणि न्यायालयाला लागणारा वेळ पाहता हे वेळापत्रक बदलू शकते.

शिंदे गटानंतर कोणाची बाजू मांडली जाणार?

असीम सरोदे यांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादानंतर धनुष्यबाण चिन्हाच्या मुद्द्यावर ध्रुव मेहता बाजू मांडणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मणिंदर सिंह युक्तिवाद करतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बाजूने शेषाद्री नायडू, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार युक्तिवाद करणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले. चिन्हाच्या मुद्द्यावर मुकुल रोहतगी यांचाही युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

१६ आमदारांचा मुद्दा आणि कपिल सिब्बल यांचा अंतिम युक्तिवाद

या प्रकरणातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका महत्त्वाची आहे. वेगवेगळे वकील काही आमदारांची बाजू मांडत असल्याने प्रत्येकाला युक्तिवादासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर्व युक्तिवादांचा विचार करून एकत्रित उत्तर मांडू शकतात. न्यायालयाने दररोज दुपारी २.३० नंतरचा संपूर्ण वेळ या प्रकरणासाठी दिला नाही, तर सुनावणी लांबण्याची शक्यता असल्याचे सरोदे यांनी नमूद केले.

निकालाचा सस्पेन्स कायम; महाराष्ट्राचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे

शिवसेनेची पक्षघटना, धनुष्यबाण चिन्हावरील अधिकार आणि आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय या प्रकरणात महत्त्वाचे आहेत. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी विविध न्यायालयीन निर्णयांचे दाखले देत बाजू मांडली, तर शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि मौखिक टिप्पण्यांमुळेही प्रकरण चर्चेत आहे.

मात्र, निकालाची अधिकृत तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दिवाळीपूर्वी फैसला होणार की त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हे पुढील सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकणाऱ्या या निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!