अमरावतीत कॅफेमध्ये दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार! 10 तरुण-तरुणी आढळले नको त्या अवस्थेत; पोलिसांची मोठी कारवाई

अमरावती : शहरातील गोपाल नगर परिसरात अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’ आणि राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपाल नगरमधील दोन कॅफेंवर अचानक छापा टाकत पोलिसांनी बंद कॅबिनमध्ये सुरू असलेल्या आक्षेपार्ह प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ‘इटालियस कॅफे’ आणि ‘बर्गर कॅफे’मधून ८ ते ९ प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल नगर येथील डी-मार्टजवळील एका कॉम्प्लेक्समध्ये ‘इटालियस कॅफे’ चालवले जात होते. या कॅफेचा चालक अमोल राहुल सूर्यवंशी (वय ३६, रा. काँग्रेस नगर) याने प्रेमी युगुलांसाठी विशेष बंद कॅबिन तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कॅफेमध्ये जादा पैसे घेऊन या बंद कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या कॅबिनमध्ये आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी दुपारी इटालियस कॅफेवर अचानक छापा टाकला. यावेळी बंद कॅबिनमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या ५ प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले.
‘बर्गर कॅफे’वरही पोलिसांची कारवाई
याच परिसरातील ‘बर्गर कॅफे’वरही राजापेठ पोलिसांच्या डीबी स्क्वॉडने कारवाई केली. एका महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या या कॅफेमधूनही ४ प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही कॅफे चालकांसह ताब्यात घेतलेल्या सर्वांना पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या कारवाईनंतर परिसरातील अशा प्रकारच्या कॅफेंवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.