Pune Accident : पुणे अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…; नेमकं काय घडलं

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात वरिष्ठांना माहिती न देणारे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि API विश्वनाथ तोडकरी या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आता हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

तसेच पोलिसांनी या प्रकरणात पुणेकरांना आवाहन केले आहे. विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबियासंदर्भात काही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हा तपास दिला आहे.

सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

तसेच अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात अनेक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्याने या सर्व तक्रारींचा तपास पुणे पोलीस करण्याची शक्यता आहे.
यासाठी पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबियांबाबत पुणेकरांना एक आवाहन केले आहे. कुठल्या ही नागरिकाला अग्रवाल कुटुंबियासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर त्याने पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, अनधिकृत हॉटेल आणि पबवर देखील प्रशासनाकडून जोरदार कारवाई अद्याप सुरूच आहे. पुणे शहरात आणखीन १७ बार आणि पब्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बारचे परवाने निलंबित केले आहेत. ४ दिवसांत एकूण ४९ बार आणि पबचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले आहेत.