उरुळी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; उरुळीकांचन प्रवासी संघाची अमोल कोल्हेंकडे मागणी, ‘या’ गाड्यांचा समावेश

उरुळीकांचन : मध्य रेल्वेच्या मुंबई-चेन्नई मार्गावरील उरुळी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे उरुळीकांचन रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. उरुळी रेल्वे स्थानकावर संबंधित गाड्यांना येताना आणि जाताना कायमस्वरूपी दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

उरुळी कांचन हे पुणे शहराच्या जवळचे आणि झपाट्याने विकसित होणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. परिसरात विविध शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, कृषी प्रक्रिया उद्योग, मोठे गृहनिर्माण प्रकल्प, फर्निचर व्यापार तसेच रोपवाटिका व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. प्रयागधाम मंदिर आणि महात्मा गांधी यांनी 1946 मध्ये स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम यामुळेही उरुळी कांचनला विशेष महत्त्व आहे.


उरुळी रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्याच्या अंतिम वाटाघाटीच्या काळात महात्मा गांधी यांना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी ब्रिटिश सरकारने मार्च 1946 मध्ये उरुळी येथे विशेष रेल्वेगाडी पाठवली होती, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, हडपसर, खराडी आयटी पार्क, भोसरी आणि तळेगाव आदी भागांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. उरुळी कांचन आणि परिसरातील नागरिकांना देशाच्या विविध भागांत प्रवास करण्यासाठी पुणे किंवा दौंड रेल्वे स्थानक गाठावे लागते. त्यामुळे उरुळी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी
निवेदनात खालील गाड्यांना उरुळी रेल्वे स्थानकावर येताना आणि जाताना कायमस्वरूपी दोन मिनिटांचा थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे :
14405 – 11406 : अमरावती-पुणे एक्सप्रेस
12135 – 12136 : नागपूर-पुणे एक्सप्रेस
12169 – 12170 : इंटरसिटी एक्सप्रेस
11423 – 11424 : शिर्डी-पुणे एक्सप्रेस
22107 – 22108 : लातूर-मुंबई एक्सप्रेस
22944 – 22943 : दौंड-इंदूर एक्सप्रेस
17013 – 17014 : काझीपेट-हडपसर एक्सप्रेस
12157 – 12158 : पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेस
12147 – 12148 : निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस
12129 – 12130 : आझाद हिंद एक्सप्रेस
22117 – 22118 : पुणे-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस
22943 – 22144 : बिदर-मुंबई (CSMT) एक्सप्रेस
12729 – 17630 : नांदेड-हडपसर एक्सप्रेस
17613 – 17614 : नांदेड-पनवेल एक्सप्रेस
22159 – 22160 : एमजीआर चेन्नई-मुंबई एक्सप्रेस
याशिवाय लोणावळा ते दौंड उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही सेवा डिसेंबर 2026 पासून सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक आणि शैक्षणिक विकास तसेच वाढता प्रवासी भार लक्षात घेता उरुळी कांचनला अधिक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून उरुळी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.