दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलसह CNG महाग, खिशाला बसतोय झटका; १० दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, आजचे नवीन दर काय?

पुणे : सर्वसामान्य जनतेला महागाईचा पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांची चिंता वाढली आहे. तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोलमध्ये ८७ पैसे प्रति लिटर आणि डिझेलमध्ये ९१ पैसे प्रति लिटर वाढ जाहीर केली आहे.

सीएनजीच्या दरातही १ रुपयाची वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांत ही तिसरी मोठी दरवाढ ठरली आहे. यामुळे एकूण इंधन दरात सुमारे ४ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
१६ मे पासून सुरू झालेल्या या दरवाढीच्या सत्रात पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामागे पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनचालकांवर नाही तर संपूर्ण पुरवठा साखळीवर होणार असून फळे, भाज्या, दूध, धान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती
वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ऑटो, टॅक्सी आणि मालवाहतूक दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल ११०.४४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९७.०१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. पुण्यात पेट्रोल १०७.८९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रति लिटर इतके दर नोंदवले गेले आहेत.