कल्याणमध्ये राजकीय भूकंप ; ठाकरे बंधूंचे 16 नगरसेवक नॉट रिचेबल, भाजपसमोर सत्ता स्थापनेचं आव्हान?

मुंबई: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निकालानंतर महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदे गट किंवा भाजपला आपला महापौर करायचा असेल तर ठाकरे बंधूंच्या १६ नगर सेवकांचा गरज लागणार आहे. आता हे सगळे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटात महापौर पदावरून रसिखेच्च सुरू आहे.१२२ सदस्यसंख्या असणाऱ्या या महापालिकेत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट ५३ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर ५० जागा जिंकत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. महापौर पद करण्यासाठी या दोघांना ठाकरे बंधूंचा नगरसेवकांची गरज लागणार आहे. या निवडणुकीत ठाकरेंच्या अकरा तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत.
अशातच आता ठाकरेंचे ११ आणि मनसेचे पाचही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. सर्वांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षात फुटाफूट होऊ नये, यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणने ठाकरे गट आणि मनसेनं आपल्या नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या अज्ञातस्थळी हलवलं आहे.

आता महापौर पदाच्या निवडीआधीच ठाकरे आणि मनसेचे सर्व नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपसमोर सत्ता स्थापनेचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.