मुंबईच्या महापौर पदासाठी राजकीय हालचालीना वेग ; ठाकरेंच्या नेत्याची शिंदेंना ‘रिक्वेस्ट’अन्…

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर महापौर पदाच्या निवडीवरून भाजप- शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली आहे. आता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलेल्या विनंतीने खळबळ उडाली आहे.

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बोलताना भास्कर जाधव यांनी महापौर पदाबाबत वक्तव्य केल आहे. तुमची बाळासाहेबांवरती खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांवर विश्वास होता का? बाळासाहेबांसमोर नतमस्तक होऊ इच्छिता का? तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
मुंबईचा महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर ते ठाकरेंना पाठिंबा देतील. एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देता कामा नये.’ असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत जे कुणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो असे सांगतात. जे कुणी बाळासाहेबांचे आम्ही खरे वारसदार आहे असे सांगतात. त्या सर्वांना मी आवाहन विनंती करतो की,मुंबईच्या महापौर निवडीसाठी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.