महाराष्ट्राच्या राजकारणात ‘PK फॅक्टर’ची एन्ट्री? देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांसोबत मॅरेथॉन बैठक; निवडणुकांपूर्वी मोठ्या रणनीतीचे संकेत


मुंबई : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून राष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चेत आलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता महाराष्ट्राच्या राजकारणातही सक्रिय होणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी त्यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या बैठकीमुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बदल, बूथस्तरावरील तयारी, जनमत चाचण्या, सोशल मीडिया प्रचार, युवक आणि शहरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. जरी या बैठकीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी तिचे राजकीय महत्त्व मोठे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, ही प्रशांत किशोर आणि पवार कुटुंबीयांची अल्पावधीत झालेली दुसरी बैठक आहे. मे महिन्यातही त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक विस्तार, सामाजिक प्रश्न आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा झाल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे वारंवार होत असलेल्या या भेटी केवळ औपचारिक नसून त्यामागे दीर्घकालीन राजकीय नियोजन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रशांत किशोर यांनी देशातील अनेक मोठ्या निवडणुकांमध्ये रणनीतीकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडेच त्यांनी बिहारमध्ये जन स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून बांकीपूरसारख्या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. या विजयामुळे त्यांच्या रणनीतीची पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र दौरा आणि देवगिरीवरील बैठक झाल्याने या घडामोडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू असून, नव्या नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच पक्षाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेली चर्चा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रशांत किशोर हे अजित पवार गटाचे अधिकृत राजकीय सल्लागार किंवा निवडणूक रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीमागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत उत्सुकता कायम असून, येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या हालचालींकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!