अंगात त्राण नाही, डोळे डबडबले… मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगेंचे समाजाला भावनिक आवाहन; म्हणाले, मला मुंबईतच…

मुंबई : मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्यातील पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. मध्यरात्री मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे त्यांनी सांगितले. बोलतानाही त्यांना त्रास होत असल्याचे दिसून आले. उपचार आणि सलाईन घेण्याबाबत समर्थकांनी आग्रह केला; मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यानंतर मध्यरात्री सुमारे अडीच वाजता त्यांनी उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधत सरकारला इशारा दिला.

‘माझं शरीर थकलं, पण सरकारला अंगावर घेण्याची ताकद ठेवतो’
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “शेवटी कोणी कोणाचं नसतं. आपल्याला आपल्या संसाराचा गाडा मोठा करायचा आहे. आपल्या लेकी-बाईंचा संसार मोठा करा. निवडणुका येतात, पण आपल्याला कोणी मोठं करत नाही. लढायला शिका.”


“18 दिवसांपासून उपोषण करत आहे. आता अंगात ताकद उरली नाही. माझं शरीर थकलं आहे. मात्र तुमच्यासाठी सरकारला अंगावर घेण्याची ताकद ठेवतो,” असेही त्यांनी सांगितले.
‘सरकारसमोर शरण जाणार नाही’
सरकारला वाटतं की आपण शरण जावं, असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारसमोर झुकणार नसल्याचे म्हटले. “मी मरेन, पण मान खाली घालू देणार नाही,” असे ते म्हणाले.
आपल्या समाजासाठी मागील अनेक दिवसांपासून काम करत असल्याचे सांगत त्यांनी, “तुमच्या लेकराचं नाव घेतल्याशिवाय मी घास घेत नाही. 23-24 दिवस तुमच्या लेकरासाठी काम केलं. मी शेतात गेलो नाही,” असेही नमूद केले.
‘सलाईन सोडल्यापासून तब्येत खालावली’
आपली प्रकृती खालावल्याचे सांगताना जरांगे पाटील म्हणाले की, “12 तारखेला सलाईन सोडली, तेव्हापासून तब्येत खालावली. सलाईन सुटल्यामुळे मला प्रवास करता येईना. आज मला हात-पाय वर करता येत नाहीत.”
दरम्यान, समर्थकांकडून सलाईन घेण्याचा आग्रह करण्यात येत होता. त्यावर त्यांनी आधी परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘58 लाख नोंदी मिळून दिल्या’
मराठा आरक्षणाच्या मागणीचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी 58 लाख नोंदी मिळून दिल्याचा दावा केला. तसेच गॅझेटच्या मागणीसाठी आता लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“तुम्ही थांबायला पाहिजे होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं, मी नंतर बोलावतो,” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
‘मला मुंबईतच मरू द्या’
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना जरांगे पाटील यांनी राजकीय संघर्षाचा उल्लेख केला. “मी माझा डाव टाकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो,” असे ते म्हणाले.
तसेच, “मला मुंबईतच मरू द्या,” असे वक्तव्य त्यांनी केल्याने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
‘आरक्षण महत्त्वाचं की दौरा?’
प्रकृती अस्वस्थ असल्याने दौरा पुढे सुरू ठेवण्याबाबतही जरांगे पाटील यांनी संभ्रम व्यक्त केला. “आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. उपोषणाच्या काळात एवढा मोठा प्रवास करणे त्रासदायक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची आजच्या वृत्तांमध्येही नोंद झाली आहे.
पाटोद्यानंतर पुढील दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी परिस्थितीनुसार मार्ग बदलण्याचे संकेत दिले. “पोटाची आग कमी झाली तर श्रीगोंदाही येतो,” असे ते म्हणाले. तसेच पोलिसांना सांगून पाटोद्यातून पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या नियोजनानुसार पाटोदा हा पहिला मुक्काम असून त्यानंतर श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे मुंबईला जाण्याचे नियोजन होते.