रामदरा रोडवरील टेकडीवर देशी दारू विक्रीचा पर्दाफाश; ६५ वर्षीय इसम ताब्यात; गुन्हे शाखा युनिट-६ची कारवाई…


लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील तिर्थक्षेत्र रामदरा रोडवरील कोळपे वस्तीच्या टेकडीवर मोकळ्या मैदानात विनापरवाना देशी दारूची विक्री सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून ६५ वर्षीय इसमाला ताब्यात घेतले.

या कारवाईत ९४ टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या आणि १२० रुपये रोख, असा एकूण ३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अक्षय राजेंद्र बांदल (वय ३५) यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून बादशहा नाथु रजपुत (वय ६५, रा. रामदरा रोड, कोळपे वस्ती, लोणी काळभोर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-६चे पथक १२ सप्टेंबर रोजी लोणी काळभोर परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी रामदरा रोड, कोळपे वस्ती येथील टेकडीवर एक व्यक्ती ९० मिलीच्या टँगो पंच देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पावणेनऊच्या सुमारास छापा टाकला असता रजपुत हा दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या ९४ बाटल्या तसेच दारू विक्रीतून मिळालेले १२० रुपये रोख जप्त केले.

जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांपैकी एका बाटलीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आला असून उर्वरित मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी रजपुत याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!