महिलांसाठी दिवाळीचं खास गिफ्ट! लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यात जमा; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

मुंबई : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र, योजनेच्या खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच समाजकल्याण विभागाच्या काही योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. सुरुवातीला पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. पुढे ही रक्कम २,१०० रुपये केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, सध्या महिलांना दरमहा १,५०० रुपयांचाच लाभ मिळत आहे.

दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात हप्ता जमा
दिवाळी जवळ येत असताना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. अखेर सरकारकडून सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक दिलासा मिळाला.

या योजनेअंतर्गत दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून १,५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातात. राज्यातील महिलांमध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

अपात्र महिलांचे अर्ज बाद; ई-केवायसीही आवश्यक
दरम्यान, योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
एकीकडे योजनेचा लाभ सुरू ठेवण्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे, तर दुसरीकडे योजनेच्या खर्चावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात लाडकी बहीण योजनेबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
