शिरुरच्या सत्तेचा खेळ फिरला! दोन्ही राष्ट्रवादींमध्ये राजकीय ठिणगी, भाजपची खेळी यशस्वी; उपनगराध्यक्षांना पदावरून हटवले


शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींचा अखेर मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता राजकीय परिस्थितीच बदलून टाकली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांचा फायदा घेत भाजपने अजित पवार गटाशी हातमिळवणी केली. या नव्या युतीमुळे शरद पवार गटाला उपनगराध्यक्षपद गमवावे लागले असून शिरुरमध्ये सत्तेची नवी गणिते तयार झाली आहेत.

शिरुर नगरपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सात, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या होत्या. एका अपक्ष नगरसेवकाने अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. संख्याबळात भाजप आघाडीवर असूनही दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले होते.

त्यावेळी सत्तेच्या वाटपात अजित पवार गटाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्याकडे नगराध्यक्षपद, तर शरद पवार गटाचे मितेश प्रदीप गादिया यांच्याकडे उपनगराध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, आता या समीकरणाला धक्का बसला आहे. गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. विशेष सर्वसाधारण सभेत या ठरावाला २० नगरसेवकांनी समर्थन दिले. बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून हटविल्याचे जाहीर केले. या घडामोडीत भाजप आणि अजित पवार गटाची जवळीक निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.

तीन विधानसभा निवडणुकांतील संघर्ष, आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!

शिरुरमधील या राजकीय बदलामागे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यातील वर्चस्वाची लढाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कटके यांनी अशोक पवार यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांतील संबंध ताणले गेल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढवल्या होत्या. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे आणि अशोक पवार एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा एकमेकांविरोधात उभे राहिलेल्या या दोन कुटुंबांमध्ये बाजार समितीच्या निमित्ताने नवे समीकरण निर्माण झाले होते.

भाजपचा पुढचा निशाणा नगराध्यक्षपद?

उपनगराध्यक्षपदाची घडामोड झाल्यानंतर आता भाजपच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेत भाजपचे ११ नगरसेवक असल्याने नगराध्यक्षपदावर पक्ष दावा करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अजित पवार गट विद्यमान नगराध्यक्षपद कायम ठेवणार की भाजपला संधी देणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीला तडा गेल्यानंतर शिरुरच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!